धान्य मिळण्यासाठी गर्दी...तहसीलदारांना कार्डधारकांकडून धक्काबुक्की 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 एप्रिल 2020

शहरातील गेंदालाल मिल, शिवाजीनगर, हुडको, जोशीपेठ, तांबापुरा आदी भागांतून कार्डधारकांनी आज दुपारी तहसील कार्यालय गाठले. आम्हाला धान्य द्यावे, अशी मागणी केली. मात्र, तुमचे कार्ड जमा करा, यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जळगाव :  केशरी शिधापत्रिकेवर धान्य मिळावे, या मागणीसाठी आज लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात गर्दी केली होती. कार्डधारकांनी धान्याची मागणी करीत थेट तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या दालनाचा ताबाच घेतला. तहसीलदार वैशाली हिंगे यांना धक्काबुक्कीचा प्रकार घडला. त्यावर तहसीलदारांनी लगेच शहर पोलिसांना बोलाविले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नायब तहसीलदार हेमंत पाटील यांच्या फिर्यादीवरून दीपककुमार गुप्ता याच्यासह दीडशे ते दोनशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 केशरी शिधापत्रिकाधारकांना सद्यःस्थितीत धान्य मिळत नाही. "लॉकडाउन' असल्याने नागरिक घरीच असल्याने पोटापाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कार्ड आहे तर किमान स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळावे, अशी अपेक्षा अनेकांची आहे. स्वस्त धान्य दुकानात गेले तर दुकानदार केशरी कार्डवर धान्य देत नाही. यामुळे करावे तरी काय, असा प्रश्‍न उपस्थित करीत शहरातील गेंदालाल मिल, शिवाजीनगर, हुडको, जोशीपेठ, तांबापुरा आदी भागांतून कार्डधारकांनी आज दुपारी तहसील कार्यालय गाठले. आम्हाला धान्य द्यावे, अशी मागणी केली. मात्र, तुमचे कार्ड जमा करा, यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मे महिन्यात धान्य मिळेल, असे सांगत असतानाही कार्डधारकांना कोणीतरी भडकाविले. आताच धान्य देण्याची मागणी करीत तहसीलदार हिंगे यांच्या दालानाच्या दरवाजाला लाथा मारून त्यांना घेराव घालून धक्काबुक्‍की करण्यात आली. यावर तहसीलदार हिंगे यांनी पोलिसांना बोलावून गर्दी पांगविली. काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, नेमके धक्काबुक्की करणारे कोण होते, कोणाच्या सांगण्यावरून कार्डधारक एकत्र आले, याचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, तहसील कार्यालयात आता पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. 

दोनशे जणांवर गुन्हा दाखल 
केशरी कार्ड असलेले आणि शहराच्या 45 टक्के कोट्याच्या बाहेर असलेल्या रेशनकार्डधारक नागरिकांनी स्वस्त धान्य मिळण्यासाठी आवश्‍यक शिक्का मारुन घेण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी केली होती. जिल्ह्यात "कोव्हिड-19'च्या पार्श्‍वभूमीवर लागू विविध कायद्यांचा भंग केल्याप्रकरणी नायब तहसीलदार हेमंत भागवत पाटील (वय 40) यांनी दिलेल्या फिर्यादवरुन दीपककुमार गुप्ता याच्यासह दीडशे ते दोनशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

"फेसबुक' लाइव्ह करणाऱ्या दोघांवर गुन्हा 
तहसीलदार वैशाली हिंगे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, कार्यालयात हजर असताना त्यांच्या चेंबरजवळ नागरिकांची गर्दी गोळा करुन त्यांना चिथावणी देत फेसबुक लाईव्ह करुन नागिाकांना तक्रारी करण्यास लावणाऱ्या दोघांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. गोंधळ घातल धक्काबुक्की केल्याप्रकरणी कैलास महारु सोनवणे (वय 50, रा. मोहाडी), शेख युनूस शेख अजिज (वय 32, रा. उस्मानिया पार्क) या दोघांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon To the tahsildars of Jalgaon Shock-up from card holders