कोरोना संसर्ग उद्रेकाच्या उंबरठ्यावर तांबापुरा...अंत्ययात्राच ठरतील घातक !

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 May 2020

कोविड विषाणूच्या संसर्गाने मृत्यू झाला असताना अनेकांनी या मृतदेहाला मोकळ्या हाताने कुठल्याही खबरदारीशिवाय हाताळले.

जळगाव  : तांबापुरातील रहिवासी, शांतता कमिटी सदस्य आणि समाज सेवकाचा शनिवारी आजारपणाने मृत्यू झाला. रुग्णालयात आणताच काही तासातच मृत्यू ओढवल्याने गोंधळही उडाला. जिल्हा रुग्णालयात दीड-दोन हजारांचा जमाव त्यावेळी एकवटला होता. कोविड संशयित म्हणून रुग्णालयाने मृतदेह नातेवाइकांना सोपवला. सामान्य अंत्ययात्रेसाठीही वीसपेक्षा अधिक व्यक्तींच्या हजेरीला मान्यता नसताना या मृताचा जनाजाप्रसंगी हजाराचा समुदाय एकवटला. आता, या मृताचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे तांबापुरा संसर्गाचा उद्रेक होण्याच्या उंबरठ्यावर असल्याची भीती निर्माण झाली आहे. 
अमळनेर, पाचोरा, भडगाव, जळगावातील वाघनगर पाठोपाठ तांबापुऱ्यातील मृताच्या अंत्यविधीला जमलेली गर्दी घातक ठरणार असून, याप्रश्‍नी जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासन अक्षरश: हतबल झाल्याचे दिसत आहे. 

जळगाव शहरातील सर्वाधिक दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या तांबापुरा झोपडपट्टीतील रहिवासी सामाजिक कार्यकर्त्याचा रविवारी (ता.24) कोविड रुग्णालयात मृत्यू झाला. मृत्यूनंतर महापालिकेने आणि पोलिस प्रशासनाने अंत्यसंस्कार मर्यादित लोकांमध्ये झाले पाहिजे, ही जबाबदारी स्वीकारली नाही. 

असा घडला प्रकार 
मृतदेह ताब्यात मिळाल्यावर नातेवाइकांनी सामान्य मृत्यू समजून कब्रस्थानात दीड-दोन हजारांच्या उपस्थितीत सामूहिक प्रार्थना आणि त्यानंतर विधिवत मृतदेहाला स्नान घालून अंत्यसंस्कार केले. कोविड विषाणूच्या संसर्गाने मृत्यू झाला असताना अनेकांनी या मृतदेहाला मोकळ्या हाताने कुठल्याही खबरदारीशिवाय हाताळले. एमआयडीसी पोलिस ठाण्याची हद्द म्हणून चार कर्मचारी कब्रस्थानाच्या प्रवेशद्वारावर हजर होते, मात्र त्यांनाही गांभीर्याचे भान नसल्याने जमाव वाढत जाऊन झुंबड उडाल्याचे चित्र दिसून आले. 

"मालेगाव'कडे वाटचाल 
तांबापुरा हा 20 हजारांवर लोकसंख्येचा दाटीवाटीच्या रहिवासाचा परिसर आहे. बहुतांश हातावर पोट असणारे अल्प व अशिक्षित नागरिक येथे वास्तव्याला आहेत. सामाजिक प्रतिष्ठा असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने जमाव एकवटला. मृत व्यक्ती एका मशिदीचे विश्‍वस्त असून, त्यांचे कुटुंब चाळीस सदस्यांचे आहे. तांबापुरा, एमआयडीसी पोलिस ठाण्यासह सर्वच शासकीय कार्यालयांत या व्यक्तीचे कामानिमित्त येणे-जाणे होते. कुणाच्याही सुख-दु:खात हजर राहणारा, मदतीला धावणारा अशी बिरुद नावाला चिकटल्याने संपर्क मोठा होता. त्यातून अंत्ययात्रेला गर्दी जमली. गर्दी जमत असताना पोलिसांनी कुठेही त्यांना हटकले नाही. आता या मृताचाच अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तांबापुऱ्यात संसर्गाचा धोका वाढला आहे. प्रशासन त्यातून बोध घेईल का? हाच खरा प्रश्‍न आहे. 

अंत्ययात्राच ठरतील घातक 
जळगाव जिल्ह्यात अमळनेर येथील महिलेच्या मृत्यू प्रकरणात अहवाल येण्याआधीच मृतदेह नातलगांना सोपवला आणि त्यानंतर अमळनेर शहरात "कोरोना'चा स्फोट घडला. भडगावच्या अंत्ययात्रेतही तसेच, पाचोरा शहरात झालेली लागणही अंत्ययात्रेमुळेच वाढली. नंतर जळगाव शहरात वाघनगर, शाहूनगरातील माजी नगरसेवकाच्या मुलीचा मृत्यू आणि आता तांबापुरातील सामाजिक कार्यकर्त्याचा अंत्यविधी अनेकांचा जीव धोक्‍यात घालणारा ठरणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon tambapura Corona infection on the verge of outbreak, funerals will be fatal

Tags
टॉपिकस