रत्नागिरीचे दोघे निजामुद्दीनमधून परतले... ओळख लपवून जळगावात थांबले !

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

शहरातील पिंप्राळा परिसरातील मशिदीजवळील खोलीत वास्तव्यास होते. याबाबतची गुप्त माहिती रामानंदनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल बडगुजर यांना मिळाली.पथकाने संपूर्ण परिसरात शोध घेऊन दोघांना ताब्यात घेतले.

जळगाव  : दिल्ली येथे झालेल्या "तबलिगी जमात'च्या "मरकज' कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या रत्नागिरी येथील दोघांना पिंप्राळा परिसरातून रामानंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासणीसाठी दोघांना जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार, मूळचे रत्नागिरी येथील दोघे दिल्लीतील निजामुद्दीन येथे आयोजित "तबलिगी जमात'च्या "मरकज' कार्यक्रमाला गेले होते. काही दिवसांपूर्वी हे दोघे मूळ गावी न जाता शहरातील पिंप्राळा परिसरातील मशिदीजवळील खोलीत वास्तव्यास होते. याबाबतची गुप्त माहिती रामानंदनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल बडगुजर यांना मिळाली. "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर ही बाब गंभीर असून, पोलिस निरीक्षक बडगुजर यांनी सतीश डोलारे, अनिल फेगडे, राकेश दुसाने यांचे पथक तयार केले. पथकाने संपूर्ण परिसरात शोध घेऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांना तपासणीसाठी पोलिसांच्या वाहनातून जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

नागरिकांमध्ये भीती 
संपूर्ण देशभरात दिल्लीच्या निजामुद्दीनचा विषय गंभीर असताना तेथे गेलेल्या प्रत्येकाची ओळख पटविली जात आहे. मात्र, शहरात स्वतःची ओळख लपवीत ते दोघे गेल्या अनेक दिवसांपासून शहरात राहत असल्याची माहिती समोर आली. पिंप्राळा परिसर दाटवस्तीचा असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

दिल्लीमधील "मरकज' कार्यक्रमास उपस्थित राहिलेले रत्नागिरी येथील दोघे पिंप्राळा परिसरातील मशिदीजवळ वास्तव्यास होते. दोघांबाबत माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार दोघांची "कोरोना'च्या तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. 
- अनिल बडगुजर, निरीक्षक, रामानंदनगर पोलिस ठाणे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Title Returned from Nizamuddin Both were in possession of Ratnagiri