हॉलमध्ये एकत्रित येऊन डॉक्‍टरांची "ओपीडी' 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 31 March 2020

कोरोनाचा संसर्ग अधिक पसरू नये म्हणून डॉक्‍टरांनी काळजी घेणे स्वाभाविक असले तरी थेट दवाखाने बंद ठेवून रुग्णांची गैरसोय करण्याबाबत नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. 

जळगाव  : रुग्णांची गर्दी लक्षात घेता दवाखाने बंद न करता शिरसोलीतील डॉक्‍टरांनी एका हॉलच्या मोकळ्या जागेत एकत्रित येऊन रुग्णांना सेवा देणे सुरू केले आहे. अगदी ज्यांना डॉक्‍टरकडे येऊनच तपासणी करून घ्यायची असेल, अशा रुग्णांना ठराविक अंतरावर उभे करून हे डॉक्‍टर त्यांची तपासणी करीत आहेत. जळगाव शहरात ज्यांनी दवाखाने बंद केले आहेत, त्यांनी असा उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. 

"कोरोना'च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील काही डॉक्‍टरांनी गेल्या आठवडाभरापासून दवाखाने बंद ठेवले आहेत. काही तज्ज्ञ डॉक्‍टरांनीही रुग्णालये बंद ठेवली असून, त्यामुळे सामान्य रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. किरकोळ आजार असलेले व नियमित तपासणीचे रुग्ण त्यामुळे त्रस्त आहेत. कोरोनाचा संसर्ग अधिक पसरू नये म्हणून डॉक्‍टरांनी काळजी घेणे स्वाभाविक असले तरी थेट दवाखाने बंद ठेवून रुग्णांची गैरसोय करण्याबाबत नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. 

शिरसोलीतील डॉक्‍टरांचा आदर्श 
जळगाव शहरालगत शिरसोली या गावातील डॉक्‍टरांनी गावातील रुग्णांसाठी "ओपीडी' सुरू ठेवण्याचा वेगळा उपक्रम राबविला आहे. दवाखान्यात गर्दी होऊ नये म्हणून तेथे प्रॅक्‍टिस करणारे डॉक्‍टर एकत्रित आले. त्यांनी ग्रामपंचायतीच्या मदतीने गावातील एक मोठा हॉल घेतला. त्याठिकाणी ठराविक वेळ देऊन रुग्णांची तपासणी सुरू केली. मोकळी जागा असल्याने एकाच जागेवर गर्दी झाली नाही. रुग्णांना ठराविक अंतरावर उभे करत त्यांची मोफत तपासणी करण्यात आली. डॉ. सोपान पाटील यांनी ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

जळगावातील डॉक्‍टरांना आवाहन 
जळगाव शहरातील काही जनरल प्रॅक्‍टिश्‍नर डॉक्‍टरांनी दवाखाने बंद केले आहेत. मात्र, रुग्णांची गैरसोय होत असल्याने या डॉक्‍टरांनी असे उपक्रम राबविले पाहिजे. काही डॉक्‍टर नियमित रुग्णांना ऑनलाइन उपचार सेवा देत आहेत. मात्र, त्या-त्या परिसरातील डॉक्‍टरांनी एकत्रित येत एखादा मोठा हॉल उपलब्ध करून घेत, त्याठिकाणी अशाप्रकारे रुग्णसेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा. 

नगरसेवकांनी घ्यावा पुढाकार 
शहरातील नगरसेवकांनी याकामी पुढाकार घेणे गरजेचे आहे. आपल्या परिसरातील डॉक्‍टरांना एखादा मोठा हॉल उपलब्ध करून देत अथवा पालिकेच्या शाळेत एकाच ठिकाणी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये वेगवेगळ्या डॉक्‍टरांची ओपीडी सुरू करता येईल. प्रत्येक भागात अनेक डॉक्‍टर्स असतात, तेथील नगरसेवकाने या डॉक्‍टरांना एकत्र आणले पाहिजे. त्यामुळे "सोशल डिस्टन्सिंग'ही पाळले जाईल आणि रुग्णांची सेवाही होईल. 

प्रभागातील काही डॉक्‍टरांशी संपर्क करून त्यांना याबाबत आवाहन करण्यात येईल. डॉक्‍टर तयार झालेत, तर त्यांच्यासाठी एखादा हॉल अथवा पालिकेच्या शाळांच्या खोल्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. डॉक्‍टरांनी या कामासाठी पुढाकार घ्यावा. 
- अनंत जोशी, नगरसेवक, जळगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Together in the hall, doctors 'OPD'