"त्या' "कोरोना'ग्रस्तासोबत प्रवास करणारे तिघे यावल तालुक्‍यातील 

अमोल कासार 
बुधवार, 1 एप्रिल 2020

संबंधित रुग्ण जळगावला, तर ते तिघे भुसावळला उतरून यावल तालुक्‍यातील गावी गेल्याची माहिती समोर आली. याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाने तपासून घेतली आहे. 

जळगाव ः जिल्ह्यात "कोरोना'चा रुग्ण आढळून आल्यानंतर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा खळबळून जागे होऊन कामाला लागली आहे. संबंधित रुग्ण जळगावात आल्यापासून तो कोणा-कोणाच्या संपर्कात आला, याबाबतची माहिती प्रशासकीय यंत्रणा गोळा करीत असतानाच तो रेल्वेने प्रवास करताना त्याच्यासोबत यावल तालुक्‍यातील तिघे होते, अशी माहिती समोर आली आहे. या तिघांचीही भुसावळ नगरपालिका रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नसल्याची खात्री पटल्यावर तिघांना चौदा दिवस "होम कॉरंटाइन' राहण्याचा सल्ला देण्यात आल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

जळगावात "कोरोना'च्या रुग्णाचा अहवाल "पॉझिटिव्ह' आल्यानंतर जिल्हा प्रशासनासह पोलिस यंत्रणा हादरून गेलेली आहे. या रुग्णाच्या कुटुंबीयांसह तो आतापर्यंत कोणकोणत्या व्यक्तींच्या संपर्कात आला याबाबतची माहिती महापालिका प्रशासनासह पोलिस प्रशासन जाणून घेत आहे. याबाबत महापालिकेने भुसावळ रेल्वे प्रशासनालाही पत्र दिले आहे. तसेच हा रुग्ण दुबईहून दिल्ली, मुंबईमागे प्रवास करीत जळगावात दाखल झाला. त्याने 18 मार्चला "शालिमार एक्‍स्प्रेस'मधून "एस-10 बोगी'तून प्रवास केला. संबंधित रुग्ण जळगावला, तर ते तिघे भुसावळला उतरून यावल तालुक्‍यातील गावी गेल्याची माहिती समोर आली. याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाने तपासून घेतली आहे. 

पत्र "व्हायरल'मुळे तिघे रुग्णालयात 
महापालिका प्रशासनाने "शालिमार एक्‍स्प्रेस'मधील "एस-10 बोगी'तून प्रवास करणाऱ्यांची माहिती जाणून घेण्यासाठी भुसावळ रेल्वे प्रबंधकांना पत्र दिले. ते सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्या तिघांमध्ये भीती निर्माण झाली. दरम्यान, हे तिघे सुजाण नागरिक असल्याने आज सकाळी त्यांनी भुसावळ येथील रेल्वे कार्यालयात संपर्क करून याबाबतची माहिती तेथील प्रशासनाला दिली. त्यानंतर तिघांची भुसावळ नगरपालिकेच्या रुग्णालयात तपासणी करण्यात आली. 

तिघांना "होम कॉरंटाइन'चा सल्ला 
"शालिमार एक्‍स्प्रेस'मध्ये "त्या' रुग्णासोबत प्रवास करणाऱ्या तिघांची भुसावळ पालिका रुग्णालयात तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांच्यात "कोरोना'ची कोणतीही लक्षणे नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिघांना पुढील 14 दिवस "होम कॉरंटाइन' राहण्याचा सल्ला दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon "The trio travels with Corona'Patient in Yaval taluka