असुरक्षित झूम ऍपला "एचडी कॉल्स'चा पर्याय 

सचिन जोशी
रविवार, 19 एप्रिल 2020

झूम ऍप'ला पर्याय म्हणून एक अधिक प्रभावी व सुरक्षित "एचडी कॉल्स ऍप' विकसित केले आहे. या ऍपद्वारे एकाच वेळी 200 जण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मीटिंग जॉईन करू शकतात. 

जळगाव : लॉकडाउनच्या काळात निर्माण झालेली गरजही शोधाची जननी ठरलीय. जळगावकर व सध्या पुण्यात संगणक अभियंता असलेल्या निनाद चांदोरकर यांनी "झूम ऍप'ला पर्याय म्हणून एक अधिक प्रभावी व सुरक्षित "एचडी कॉल्स ऍप' विकसित केले आहे. या ऍपद्वारे एकाच वेळी 200 जण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मीटिंग जॉईन करू शकतात. 

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या देशभरात लॉकडाउन सुरू आहे. त्याचा फटका अनेक मोठ्या कंपन्यांना बसलाय. अनेक कंपन्या, संस्थानी "वर्क फ्रॉम होम' सुरू केले असून, त्यातून रिझल्ट्‌स देणे सुरू आहे. याच "वर्क फ्रॉम होम'मधून अनेक कंपन्यांच्या मीटिंगही "फ्रॉम होम' सुरू आहेत. त्यासाठी काही कंपन्यांच्या मीटिंग, शाळा- महाविद्यालयांचे वर्ग "झूम ऍप'द्वारे सुरू आहेत. 

गरजेतून निर्मिती 
पुण्यात अभियंता असलेल्या निनाद यांच्या कंपनी मीटिंगही या ऍपद्वारे सुरू झाल्या. पण, त्यात अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. एकाच वेळी समांतर दुसरी मीटिंगही शक्‍य नव्हती. त्यावर निनाद यांनी सलग 8-10 दिवस काम करत एक नवीन "ऍप' विकसित केले. त्या ऍपची सर्वर टेस्टिंग केली, ती यशस्वी ठरली. या ऍपद्वारे त्यांनी त्यांच्या कंपनीची मीटिंग घेणे सुरू केले. हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला. 

एचडी कॉल्स ऍप 
"झूम ऍप'मध्ये ज्या त्रुटी होत्या, त्या यात दूर करण्याचा प्रयत्न निनाद यांनी केला. यात अधिक तांत्रिक सुविधा देण्यात आल्या आहेत. एकाच वेळी 200 जण यात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होऊ शकतात. तसेच एकाच वेळी एकापेक्षा जास्त मीटिंग कंडक्‍ट होऊ शकतील. या ऍपला निनाद यांनी "एचडी कॉल्स' असे नाव देण्यात आले. 

सर्वर उपलब्ध झाल्यावर काम 
सध्या हे ऍप मर्यादित यूजर वापरू शकतात. कारण, ऍप कनेक्‍टसाठी आवश्‍यक सर्वर सध्या उपलब्ध नाहीत. लॉकडाउनमुळे सर्वर उपलब्ध होऊ शकत नाही. ते उपलब्ध झाल्यावर हे ऍप व्यावसायिकपणे 
बाजारात येऊ शकेल. या ऍपचे व्यावसायिक लॉन्चिंग झालेले नाही. सर्वर उपलब्धता झाल्यावर स्टार्टअपसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. 

कोण आहेत निनाद? 
निनाद हे मूळ जळगावचे रहिवासी. कला व संगीत क्षेत्रात अग्रेसर चांदोरकर प्रतिष्ठानचे विश्वस्त दीपिका व दीपक यांचे सुपुत्र. जळगावी रुस्तमजीमध्ये दहावी, नंतर ठाण्यात डिप्लोमा, पुण्यात रायसोनी महाविद्यालयातून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पूर्ण केले. 

सुरक्षित ऍप 
हे ऍप झूम, ग्लोबल मीट, उबेर कॉन्फरन्स या ऍपपेक्षा अधिक सुरक्षित आहे. एकदा मीटिंग झाल्यावर यातील डाटा आपोआप नष्ट होणार आहे, शिवाय ऍप टेक्‍निकली परफेक्‍ट आहे. 
- निनाद चांदोरकर, संगणक अभियंता 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Unsafe zoom aap hd call aap devolop