उमेदवारीची खेळी भाजपच्या अंगलट येणार? 

khadse fadnvis patil
khadse fadnvis patil

जळगाव : राज्यात भारतीय जनता पक्षाची सूत्रे ज्यांच्याकडे आहेत, त्यांनी आपली पक्षावर अद्यापही "कमांड' आहे, हे दाखविण्यासाठी विधानपरिषद निवडणुकीत उमेदवार निवडताना पुन्हा एक खेळी केली. रस्त्यावर खेळ करणाऱ्या जादूगाराप्रमाणे प्रथम सर्व निश्‍चित केले. परंतु मनोरंजनासाठी जुन्या नेत्यांना आशा दाखविण्याची खेळी करण्यात आली. मात्र, आता ही खेळी भाजपच्या राज्य नेतृत्वाच्या अंगाशी येणार की वादळ उठून परत शांत होणार, याकडेच लक्ष आहे. 
राज्यात भाजपची "कमांड' असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडेही राज्यात नावे निश्‍चित करण्याची सूत्रे होती. माजी मंत्री एकनाथराव खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या तिघांची नावे पक्षातर्फे निश्‍चित करण्यात आल्याचेही सांगण्यात आले होते. त्यांच्यावर दिल्लीतील नेत्यांचा शिक्कामोर्तब होणार आहे, असेही या नेत्यांना सांगण्यात आले. मात्र पक्षाच्या दिल्लीच्या वरिष्ठ नेत्याकडून यादी आली आणि महाराष्ट्र भाजपमध्ये जोरदार भूकंपच झाला. कारण राज्य समितीने जी नावे सुचविली असल्याचे सांगितले होते. त्यापैकी एकही नाव त्यात समाविष्ट नव्हते. चारही उमेदवार नवीन आहेत. 
दिल्लीहून यादी आली आणि महाराष्ट्रातील भाजपच्या सर्वच नेत्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही याबाबत आश्‍चर्य व्यक्त करीत आता पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडून यादी आल्यामुळे जुन्या नेत्यांनी समजुतीने घ्यावे, असा सल्लाही दिला. तर भाजपचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनीही या यादीबाबत आश्‍चर्य व्यक्त केले. तेही म्हणाले, वरिष्ठांकडे जुन्याच नेत्यांची नावे कळविली होती. मात्र, आता नवीन नावे घेण्याचा वरिष्ठांचा निर्णय आहे, त्यामुळे तो मान्य करावाच लागेल. 
दिल्लीतून आलेल्या यादीबाबत सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सर्व चारही उमेदवारांची नावे दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी परस्पर घेतली आहेत. असे आता राज्यातील भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. विधानपरिषदेसाठी नावे सुचविण्यासाठी कोअर कमिटीची बैठक, तसेच राज्यातील इच्छुकांचे अर्ज मागविणे हा सर्व खेळ झाला. त्यातून नावे छाननी करून ती कळविण्यात आली. मात्र, महाराष्ट्रातून पाठविण्यात आलेली यादी रद्द करून दिल्लीतून नवीन यादी आली. महाराष्ट्रातून नावे दिल्याशिवाय दिल्लीतून नावे येऊ शकतात काय? दिल्लीतून नावे आल्यानंतर महाराष्ट्रातील एकाही वरिष्ठ नेत्याने त्याबाबत वक्तव्य का केले नाही. सर्वजण गप्प कस बसले, असा सवालही कार्यकर्त्यांकडून होत आहे. त्यामुळे ही सर्व "खिचडी' तयार होती. फक्त स्वयंपाक सुरू असल्याचे दाखविण्यात आले. 

वादळ कुठल्या दिशेने... 
विधानपरिषद निवडणुकीतील या प्रकाराबाबत जुन्या नेत्यांपैकी खडसे यांनी खुल्यापणाने प्रतिक्रिया व्यक्त केली असून, निष्ठावंतांना डावलून पक्षाला शिव्या देणाऱ्यांना उमेदवारी दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. या शिवाय पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राज्यातील पक्षनेतृत्वाविरुद्ध घोषणा देऊन निषेध केला आहे. राज्याच्या नेतृत्वाचा विधानपरिषद उमेदवार निवडीचा हा खेळ नेतृत्वावरच उलटणार की नेहमीप्रमाणे वादळ उठून शांत बसणार, हे येणाऱ्या काळातच दिसून येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com