साचलेल्या कचऱ्यानेही जळगावकर भयभीत ! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 मार्च 2020

नियोजन शून्य तसेच व्यवस्थित कचरा संकलन होत नसल्याने शहरातील रस्त्यांवर तसेच कॉलनी, वसाहतींमधील उघड्या जागेवर अजून ही कचरा उचलला जात नसल्याने कचऱ्याचे ढीग असल्याचे दिसत आहे. 

जळगाव ः शहरात गेल्या महिन्याभरापासून सफाई मक्तेदाराने कचरा कोंडी निर्माण केली आहे. त्यात "कोरोना' विषाणूंमुळे देशभरासह जळगाव मध्ये नागरिकांमध्ये भीती आहे. जळगावकर सद्या शहरात साचलेल्या कचऱ्याने भयभीत असल्याचे चित्र आहे. मात्र महापालिका प्रशासन गांभीर्य घेत नसून संचारबंदीच्या काळात रस्ते मोकळे, परिसर मोकळे असून त्याचा फायदा घेऊन सफाई मोहीम करत नसल्याचे दिसत आहे. 

शहरातील दैनंदिन सफाईचा मक्ता महापालिकेने नाशिक येथील वॉटरग्रेस कंपनीला दिला. परंतु एक महिन्यापूर्वी मक्तेदाराने सफाई व कचरा संकलनाचे काम बंद केल्याने शहरात जागो जागी कचऱ्याचे ढीग साचले होते. महापौर भारती सोनवणे यांच्यासह महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या वाहनचालक तसेच कायमचे सफाई कर्मचाऱ्यांना घेऊन शहरात स्वच्छतेचे काम सुरू केले. परंतु नियोजन शून्य तसेच व्यवस्थित कचरा संकलन होत नसल्याने शहरातील रस्त्यांवर तसेच कॉलनी, वसाहतींमधील उघड्या जागेवर अजून ही कचरा उचलला जात नसल्याने कचऱ्याचे ढीग असल्याचे दिसत आहे. 

कचराकुंड्या भरलेल्या 
शहरात अनेक रस्त्यांवरील कचरा कुंड्या तसेच मोकळ्या जागेवर कचरा तसाच पडला आहे. महापालिकेचे 
आरोग्य विभागाचे गाड्या फिरताना दिसतात मात्र कचरा उचललेला दिसत नसल्याचे चित्र आहे. 

आरोग्य विभागाचे थंड काम 
शहरात "कोरोना' मुळे संचारबंदी असल्याने रस्त्यावर शुकशुकाट आहे. त्यामुळे राज्यातील इतर शहरातील महापालिका शहरात जंतुनाशक फवारणीचे काम त्वरित सुरू केले. मात्र जळगाव महापालिकेला उशिरा जागा येत औषध फवारणीचे काम मंगळवारपासून सुरू केल्याने "कोरोना' बाबत महापालिका अजून ही गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहे. 
 
गिरणा टाकी, रामानंद रस्त्याच्या बाजूला कचरा 
शहरातील गिरणा टाकी, काव्यरत्नावली चौक, रामानंदनगर रस्ता तसेच गिरणा पंपिंग रस्ता, हरिविठ्ठलनगर रस्ता व श्‍याम नगरातील रस्त्यावरील साचलेला कचरा अनेक दिवसापासून उचलला गेलेला नाही. त्या परिसरात दुर्गंधी व डासांचा उपद्रव वाढल्याने साथरोगांच्या आजारांचे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

महापालिका कचरा उचलण्यावर भर देत नसल्याने रामानंद नगरातील रस्त्यावर कचराकुंड्या ओसंडून वाहत आहे. महापालिकेने हा लवकर उचलावा यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. 
दिनेश बारी (नागरिक) 

शहरात गेल्या अनेक दिवसापासून कचरा साचलेला आहे. त्यात "कोरोना'चे सावट असून नागरिक दहशतीत आहे. त्यामुळे साथरोगांचा आजार तसेच "कोरोना'च्या विषाणूंचा संसर्ग बघता तत्काळ स्वच्छता मोहीम राबवावी. 
विशाल पाटील (नागरिक) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Wastes not collectors are scared to burn