नाथाभाऊंना पक्षाने "होम क्वारंटाइन' का केले? : मंत्री गुलाबराव पाटील 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

भाजप "कोरोना'संदर्भात आंदोलन करणारच असेल, तर त्यांनी गुजरात सरकार, केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकारविरोधातही आंदोलन करावे.

जळगाव: "कोरोना'च संकट जगातील 192 देशांत आहे. मात्र, भाजप महाराष्ट्रातील "कोरोना' विषयावर आंदोलन करीत आहे. ही आंदोलनाची वेळ नव्हे; जनतेची सेवा करण्याची आहे. त्यांना राजकारण करायचेच असेल, तर नाथाभाऊंना (एकनाथराव खडसे) "क्वारंटाइन' का केले? याचे उत्तर भाजपने जनतेला द्यावे, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांनी केले आहे. 

भाजपतर्फे उद्या (ता. 22) राज्यभर करण्यात येणाऱ्या "महाराष्ट्र बचाव' आंदोलनावर त्यांनी जोरदार टीका केली. पक्षाने आंदोलन करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आज त्यांच्या उपस्थितीत खरीप हंगामाची आढावा बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. भाजपतर्फे उद्या (ता. 22) "महाराष्ट्र बचाव' आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना मंत्री पाटील म्हणाले, की सद्यःस्थितीत पक्ष, जात, धर्म हा विषयच नाही. आजच्या स्थितीत "कोरोना'चे संकट महत्त्वाचे आहे. सर्वांनी मिळून या संकटाशी सामना करून त्याला हरवायचे आहे. त्यामुळे भाजपने राज्यात सरकारविरोधात आंदोलन करण्यापेक्षा "कोरोना'च्या संकटकाळात जनतेची सेवा करावी, अशी भाजपला आपली विनंती असेल. त्यांना आंदोलन करायचेच असेल, तर त्यांनी "कोरोना'चे संकट संपल्यानंतर जनतेच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आंदोलन करावे. मात्र, आता त्यांनी आंदोलन केले, तर ते चुकीचे ठरणार आहे, तसेच वेगळ्या दिशेने जाण्याचाही संभव आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलन करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. 

नाथभाऊंना "क्वारंटाइन' का केले? 
भाजप "कोरोना'संदर्भात आंदोलन करणारच असेल, तर त्यांनी गुजरात सरकार, केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकारविरोधातही आंदोलन करावे. तेथील सरकारांनाही प्रश्‍न विचारावेत. तेथेही "कोरोना'चा प्रश्‍न आहे. "कोरोना' हा काही एकट्या महाराष्ट्राचा प्रश्‍न नाही, ते जगातील 192 देशांचे संकट आहे. त्यामुळे त्याविरोधात भाजपने राजकारण करणे योग्य नाही आणि जर राजकारणच करावयाचे असेल, तर नाथाभाऊंना पक्षाने "क्वारंटाइन' का केले? याचे उत्तर भाजपने जनतेला द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Why did the bjp party "home quarantine" Nathabhau?, minister gulabrave patil stetment