"राज्य उत्पादन शुल्क'चे "सील' तोडून दारुची तस्करी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 एप्रिल 2020

अजिंठा चौकातील वाईन शॉप आणि नशिराबाद येथील गोदामावर उशिरापर्यंत स्टॉक तपासणीचे काम सुरू होते. देशभरात "लॉकडाउन' सुरू असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने लावलेले सील तोडून मालकाच्या मुलाकडून दारुची तस्करी सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. 

जळगाव : अजिंठा चौकातील राज वाईनच्या (आर. के. वाईन) गोदामातून आज पहाटे चारच्या सुमारास कारमधून विविध ब्रॅण्डच्या दारुची तस्करी करताना गुन्हे शाखेच्या पथकाने चौघांना पकडले. यावेळी संशयितांच्या ताब्यातील वाहनासह 3 लाख 60 हजार 54 रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. दरम्यान, अजिंठा चौकातील वाईन शॉप आणि नशिराबाद येथील गोदामावर उशिरापर्यंत स्टॉक तपासणीचे काम सुरू होते. देशभरात "लॉकडाउन' सुरू असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने लावलेले सील तोडून मालकाच्या मुलाकडून दारुची तस्करी सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. 

संपूर्ण देशभरात "लॉकडाउन' जाहीर झाल्याने अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्वच बंद आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्ह्यातील सर्व "वाईन शॉप'चा स्टॉक "सील' करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत जळगावसह खानदेशातील मोठा डिस्ट्रिब्युटर असलेल्या अजिंठा चौकातील राज वाईन (आर. के. वाईन) दुकानाच्या मालकाने "लाकडाउन' झुगारून चक्क दारुची तस्करी चालवली होती. दररोज मध्यरात्रीनंतर अलिशान कारमध्ये चार ते पाच लाखांचा माल लोड करून ब्लॅकने त्याची विक्री करण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हेशाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांच्या पथकातील किरण धनगर, रवींद्र घुगे, प्रमोद लाडवंजारी, राजेश मेंढे, संजय हिवरकर यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीचा पाठलाग करुन राज वाईन शेजारीच गोदामातून कारमध्ये (एमएच 18, डब्लू. 9842) विविध ब्रॅण्डची दारू भरुन निघण्याच्या तयारीत असताना छापा टाकला. यावेळी दुकान मालकाचा मुलगा दिनेश राजकुमार नोतवाणी, नितीन श्‍यामराव महाजन, नरेंद्र अशोक भावसार, व्यवस्थापक गणेश कासार अशा चौघांना ताब्यात घेतले. 

पोलिस पाहून मालक पसार 
गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाल्यावरून मध्यरात्रीपासून सापळा लावण्यात आला होता. दुकानाचा मालक असलेल्या दिनेशने राज्य उत्पादन शुल्क विभागाने लावलेले सीलबंद कुलूपे उघडून त्यातून माल भरण्यास सुरवात केली. पहाटे सव्वाचारच्या सुमारास पोलिसांची चाहुल लागताच दिनेशने पोबारा केला. पथकाने तिघांना ताब्यात घेतल्यावर दिनेशला बोलावून घेतले. 

दुकानाचे लायसन्स महिलेच्या नावे 
"आर. के. वाईन्स' या दुकानाचे लायसन्स दिशा दिनेश नोतवाणी यांच्या नावे असून, पोलिसांनी तपासणी करुन तत्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागासह जिल्हाधिकाऱ्यांना माहिती कळविली. थोड्याच वेळात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी राज वाईनमधील (आर. के. वाईन्स) उपलब्ध साठा (स्टॉक) तारखेनुसार तपासणीस सुरवात केली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon wine shop raid State excise duty sill