पहिले शंभर रुग्ण 40 दिवसांत... अन्‌ अठरा दिवसात साडेतीनशे 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 May 2020

शंभर ते दोनशेपर्यंत पोहोचण्यास सहा दिवस, पुढचे शंभर होण्यासाठी देखील सहा दिवस लागले. मात्र, पुढच्या सहा दिवसात दीडशे रुग्ण संख्या वाढली आहे. 

जळगाव ः जिल्ह्यात "कोरोना व्हायरस' संसर्ग वाढत असताना नागरिक मात्र बिनधास्तपणे बाहेर फिरताना दिसतात. लॉकडाउनचे सर्व नियम धाब्यावर बसविल्याने आता स्थिती गंभीर होत आहे. यामुळेच जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख चढता असल्याने आज बाधितांची संख्या 455 वर पोहचली आहे. जिल्ह्यात पहिला रुग्ण आढळल्यानंतर शंभरीपर्यंत पोहोचण्यास चाळीस दिवसांचा कालावधी लागला. मात्र, पुढील साडेतीनशेचा आकडा पूर्ण करण्यास केवळ अठरा दिवसांचा कालावधी लागला आहे. 

"कोरोना'च्या रुग्णांत देशाने 50 हजारांचा टप्पा पार केला असून, त्यातही महाराष्ट्र अग्रेसर आहे. राज्याची परिस्थिती पाहिल्यास मुंबईनंतर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव सर्वाधिक "कोरोना'बाधितांची संख्या झाली. त्या खालोखाल आता जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने बाधितांची संख्या 455 वर पोहोचली आहे. आकडा रोज वाढत असल्याने पुढील काही दिवसांत ही स्थिती आणखी गंभीर होण्याचे चित्र आहे. 

पहिल्या "पॉझिटीव्ह'ने वाढविली धडधड 
जळगावातूनच नव्हे तर खानदेशातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 28 मार्चला आढळून आला. पहिला पॉझिटिव्ह रुग्णाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण जिल्हावासीयांची धडधड वाढली होती. यानंतर लागलीच पाच दिवसांनी म्हणजे 2 एप्रिलला दुसरा बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला होता. मात्र, मेहरुण परिसरातील रहिवासी असलेला जिल्ह्यातील पहिला रूग्ण चौदा दिवसांनी बरा होऊन घरी परतला. या दरम्यान, जिल्हा "ग्रीन झोन' होण्याकडे वाटचाल करत असताना आणखी "पॉझिटिव्ह' आल्याने चिंता वाढली, ती अजून देखील वाढतच आहे. 

कमी दिवसात जास्त बाधित 
जळगावात पहिला रुग्ण आढळल्यानंतर बाधितांचा आकडा शंभरपर्यंत पोहोचण्यासाठी 39 दिवसांचा कालावधी लागला. जिल्ह्यातील ही संख्या वाढणे म्हणजे "कोरोना'चा आलेख धिमा होता. मात्र, जिल्ह्यात शंभर रुग्ण पूर्ण झाल्यानंतर कमी दिवसांत बाधितांची संख्या झपाट्याने वाढली. अर्थात शंभर ते दोनशेपर्यंत पोहोचण्यास सहा दिवस, पुढचे शंभर होण्यासाठी देखील सहा दिवस लागले. मात्र, पुढच्या सहा दिवसात दीडशे रुग्ण संख्या वाढली आहे. 

दृष्टिक्षेपात रुग्णसंख्या (शंभरी गाठलेले) 
28 मार्च........1 
7 मे.............100 
13 मे...........200 
19 मे...........300 
23 मे...........400 
25 मे...........450 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgoan first hundred patients in 40 days, and three hundred fifty in eighteen days