"लॉकडाउन'मध्ये संकल्पना...तरुणाने थाटला "ऑनलाइन' भाजीबाजार 

अमोल महाजन  
Friday, 10 April 2020

व्यापारी, वितरक आणि विक्रेते ही मध्यस्थांची साखळी बंद झाल्यामुळे दोघांच्या फायद्यात भर पडली आहे थेट शेतकऱ्याकडूनच माल विकत घेऊन शेतकऱ्यांचाही फायदा झाला पाहिजे हा मानस कल्पेशचा आहे. 

जळगाव:  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशात लॉकडाउनची स्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्‍कील झाले आहे. यावर व्हाट्‌सऍपचा उपयोग करून भाजीपाला विक्रीतून रोजगाराची संधी मिळवण्याची भन्नाट कल्पना चोपडा तालुक्‍यातील धानोऱ्याच्या 22 वर्षीय कल्पेशने साकारली आहे. स्वतःसह त्याने अन्य चार-पाच तरुणांनाही रोजगार उपलब्ध करून दिलाय. 

ग्राहकांना लॉकडाउनच्या काळात घराबाहेर न जाता फक्त एका व्हाट्‌सऍप मेसेजच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतातील ताज्या आणि चांगल्या दर्जाच्या भाज्या तसेच फळे माफक दरात त्यांना घरपोच उपलब्ध करून दिला जात आहे. या यंत्रणेचा शेतकरी आणि ग्राहकांना फायदा होत आहे. व्यापारी, वितरक आणि विक्रेते ही मध्यस्थांची साखळी बंद झाल्यामुळे दोघांच्या फायद्यात भर पडली आहे थेट शेतकऱ्याकडूनच माल विकत घेऊन शेतकऱ्यांचाही फायदा झाला पाहिजे हा मानस कल्पेशचा आहे. 

तरुणांनाही दिला रोजगार 
लॉकडाउनमुळे अनेकांचे रोजगाराचे साधन बंद पडले असून कल्पेशने सुरू केलेल्या भाजीपाला व्यवसायाला मदत म्हणून काही तरुणांनाही रोजगार उपलब्ध करून त्यांना मोठा आधार दिला आहे. 

जैविक भाजीपाला लागवड 
कल्पेशचे वडील शेतकरी असून त्यांच्याकडे 10 एकर शेती आहे. दिवसेंदिवस शेती करणे जिकरीचे झाले असल्याने पुढे घर कसे चालेल, ही चिंता त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याने केळीला पर्याय म्हणून आपल्या शेतात जैविक पद्धतीने भाजीपाला लागवड करून त्याद्वारे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना सुचली असल्याचे त्याने "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

व्हॉट्‌सऍपद्वारे विक्री 
व्हॉट्‌सअप हे केवळ मनोरंजन व टाइमपासचे साधन न ठेवता त्याने आपल्या व्यवसायाला व्हॉट्‌स अपची जोड दिली आहे. ग्राहकांनी व्हॉट्‌स अपवर भाजीपाल्याची ऑर्डर नोंदविल्यावर त्यांना भाजीपाला घरपोच माल डिलिव्हरी केली जाते. 

भाजीपाल्याचे निर्जंतुकीकरण 
कोरोनामुळे सध्या लोकांच्या मनात धास्ती निर्माण झाली असून यामुळे भाजीपालाही घेताना नागरिकांना भीती वाटत आहे. त्यामुळे भाजीपाला पॅकिंग करताना कडूनिंबाचे पाणी, तुरटी व सॅनिटायझर फवारणी करून ग्राहकांना माल पुरवला जातो. 

प्रत्येक क्षेत्रात ऑनलाइन ट्रेडिंग वाढत असताना भाजीपाला ऑनलाइन विक्रीचाही प्रयत्न सुरू आहे. ऑनलाइन बुकिंग आणि फोनद्वारे ग्राहकाला भाजीपाल्याची मागणी शक्‍य झाली आहे. सोयीनुसार घरपोच भाजीपाला मिळत असल्याने ग्राहकांच्या संख्येत भर पडत आहे. विशेष म्हणजे विविधता असल्यामुळे ऑनलाइन बुकिंगचा प्रतिसाद वाढला आहे. एकूण मागणीचा अंदाज घेऊन ताजा भाजीपाला मागवला जातो. या भाजीपाल्याचे पॅकिंग करून ग्राहकांना मागणीनुसार घरपोच दिला जातो. 
-कल्पेश महाजन 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgoan he concept of "lockdown" young man thinks "online"