सावकाराच्या जाचास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 मार्च 2020

जामनेर : मोहाडी (ता. जामनेर) येथील शेतकरी जगदीश रतनसिंग राजपूत (वय ५०) यांनी सावकाराच्या जाचास कंटाळून आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी त्यांचा मुलगा दर्शन जगदीश राजपूत याने दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रकाश बंडू कुमावत व विजय बंडू कुमावत (रा. कांचननगर, जळगाव) या दोन्ही भावांविरुद्ध अवैध सावकारीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आत्महत्येपूर्वी मृताच्या खिशात संबंधित सावकारांबाबत लिहिलेल्या मजकुराने चांगलीच खळबळ उडाली आहे. 

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २००० मध्ये मृत जगदीश राजपूत यांनी आर्थिक अडचणीमुळे प्रकाश व विजय कुमावत यांच्याकडून दीड लाख रूपये घेतले होते. त्याबदल्यात गट क्रमांक १०१/२/अ/२ ही शेतजमीन ७६ हजारांच्या सरकारी किमतीनुसार खरेदीखतासह नावे करून दिली होती. त्यावेळी व्याज- मूळ रकमेबाबतही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. २००७ मध्ये मृत जगदीश राजपूत व त्यांची पत्नी रुक्मणाबाई हे मूळ रक्कम अधिक व्याजाची रक्कम जळगाव येथे सावकारांकडे घेऊन गेले असता, त्यांनी आणलेले पैसे न घेता आणखी जास्तीच्या रकमेची मागणी केली होती. त्यानंतरही अनेक वेळा शेतजमिनीची मागणी करूनही ती परत केली नाही. आणखी गेल्या महिन्यात २१ फेब्रुवारी २०२० ला मृत जगदीश राजपूत व विठ्ठल परदेशी, अमोल राजपूत, विठ्ठल देवरे, दीपक राजपूत, अजय राजपूत आदींसह जळगाव येथे जाऊन, विजय कुमावत आणी प्रकाश कुमावत या सावकारांकडे गेले होते. मूळ रक्कम अधिक व्याज मिळून एकूण सहा लाख रुपये देण्यास तयार असताना मात्र दोन्ही सावकारांकडून ४० लाखांची मागणी करण्यात आली होती. त्यानंतरही वारंवार मृतास सावकाराकडून पैशांची मागणी भ्रमणध्वनीवरून करण्यात येत होती तसेच धमकीही दिली जात होती. 

आज माझे काही खरे नाही...! 
सकाळी साडेआठच्या सुमारास वडिलांसोबत चहा घेत असताना ‘आज माझे काही खरे नाही,’ असे बोलून, शेतीसंदर्भात विजय कुमावत व प्रकाश कुमावत मोबाईलवरून धमकी देत आहेत, असे वडिलांनी मला सांगितले. त्यावर मी त्यांना सांगितले, की सर्वकाही ठीक होईल, काळजी करू नका, असे मुलाने सांगितले. त्यानंतर मृत जगदीश राजपतू काहीतरी लिहिताना दिसत होते. त्यानंतर काकूकडून जेवून आल्यावर दर्शन (मृताचा मुलगा) याने वडिलांनाही जेवण करण्यासाठी बोलाविले. मात्र, घरातून आवाज आला नाही, जाऊन पाहिले असता, वडिलांनी गळफास घेतलेला दिसला. फौजदार युवराज अहिरे तपास करीत आहेत. दोघा संशयितांना अद्याप अटक झाली नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner farmer sucide loan Lender torture