विधानभवनावर "कडकनाथ' शेतकऱ्यांचा 13ला धडक मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

नाशिक : अस्मानी संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना कडकनाथ कोंबड्यांच्या कुक्कटपालन व्यवसायातून 800 कोटींचा गंडा घालणाऱ्या महारयत ऍग्रो इंडिया कंपनीविरोधात राज्यभर गुन्हे दाखल झाले आहेत. याचप्रकरणी राज्यभरातील शेतकरी येत्या 13 तारखेला कडकनाथ कोंबडी पालन संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा विधानभवनावर काढण्यात येणार आहे. 

नाशिक : अस्मानी संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना कडकनाथ कोंबड्यांच्या कुक्कटपालन व्यवसायातून 800 कोटींचा गंडा घालणाऱ्या महारयत ऍग्रो इंडिया कंपनीविरोधात राज्यभर गुन्हे दाखल झाले आहेत. याचप्रकरणी राज्यभरातील शेतकरी येत्या 13 तारखेला कडकनाथ कोंबडी पालन संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा विधानभवनावर काढण्यात येणार आहे. 

कडकनाथ कोंबडी पालन संघर्ष समितीचे निमंत्रक दिग्विजय पाटील यांनी उत्तर महाराष्ट्रात फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेत येत्या 13 डिसेंबर रोजी मुंबईत विधानभवनांवर धडक मोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन केले. महारयतच्या संचालकांवर एमपीआयडीअंतर्गत गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना तात्काळ न्याय मिळण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांकडून तपास करावा आणि जलद न्यायालयात खटला चालविण्याची मागणीसाठी हा धडक मोर्चा काढण्यात येत असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. यावेळी नाशिकचे शेतकरी शिवदास साळुंखे, प्रल्हाद भोये, विजय चुंभळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. 

नक्की वाचा- अल्ट्रासॉनिक सेन्सरची टोपी देत चार मिटरपर्यत अडथळ्याची जाणीव

भाजपा सरकार दळभद्री 
नाशिक जिल्ह्यातही सुमारे 40 शेतकऱ्यांची 1 कोटी 10 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. सांगली येथील महारयत ऍग्रो इंडिया कंपनीने शेतकऱ्यांना कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायासाठी प्रोत्साहित करून त्यामोबदल्यात आर्थिक फायदा करून देण्याचे आमिष दाखवले होते. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, कोकण, उत्तर महाराष्ट्र, बेळगाव यासह पंजाब, राज्यस्थान, हरियाणा, मध्यप्रदेश या राज्यातील सुमारे 8 ते 9 हजार शेतकऱ्यांची 800 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. यासंदर्भात सांगली, सातारा, नाशिक, कोल्हापूर याठिकाणी पोलीसात गुन्हे दाखल झाले आहेत. पण ÷भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या हिताऐवजी कंपनीच्या संचालकांचा बचाव करण्याचा दळभद्री प्रयत्न केल्याचा आरोप दिग्विजय पाटील यांनी केला आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेप्रसंगी सांगलीत त्यांच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या भिरकावण्यात आल्या होत्या. 
 
बेळगावातून निघणार मोर्चा 
कडकनाथ कोंबड्या पालन संघर्ष समितीतर्फे येत्या 9 तारखेला बेळगावातून धडक मोर्चाला प्रारंभ होईल. 10 तारखेला कोल्हापूर, 11 तारखेला सातारा, 12 तारखेला पुणे आणि 13 तारखेला मुंबईत विधानभवनावर धडक मोर्चा पोहोचेल. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समितीचे शिष्टमंडळ भेटून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी करणार आहे. या धडक मोर्चात सुमारे अडीच हजार शेतकरी सहभागी होणार आहेत. यासाठी राज्यभर तालुकास्तरावर बैठका सुरू आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news kadaknath farmers in maharashtra