कांद्याचे बियाणे कुठे स्वस्त मिळेल यासाठी शेतकऱयांना करावी लागतेय भटकंती  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांद्याचे बियाणे कुठे स्वस्त मिळेल यासाठी शेतकऱयांना करावी लागतेय भटकंती 

संबंधित कंपन्यांचे भाव एकदम कसे वाढले, याची विचारणा शेतकरी करू लागले आहेत. दरम्यान, अद्याप पावसाचे प्रमाण वाढतेच आहे. पाण्याचे सर्व स्त्रोत तुडुंब भरले आहेत. कांद्याची वाढीव लागवड करण्यासाठी बियाणे आवश्यक आहे.

कांद्याचे बियाणे कुठे स्वस्त मिळेल यासाठी शेतकऱयांना करावी लागतेय भटकंती 

कापडणे ः सततच्या पावसामुळे पावसाळी कांद्याची लावणी १० टक्केही झाली नाही अन्‌ आता लावणीचे रोपही शेष राहिलेले नाही. नव्या कांद्याच्या लागवडीसाठी रोप तयार करण्याकरिता आवश्यक बियाण्याचे भाव अव्वाच्या सव्वा वाढले आहेत. शंभर टक्के उबवण असलेले गॅरंटीचे बियाणे प्रतिकिलो चार हजार रुपयांवर पोहोचले आहे. घरगुती बियाणेही तीन हजारांवर आहे. त्यामुळे वाजवी भावात असलेले बियाण्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी स्वस्त बियाणे कुठे मिळेल का, यासाठी भटकंती करीत आहेत. 

भाव होतात तिप्पट 
कांदाटंचाई निर्माण झाल्याने भाव वाढू लागले आहेत. प्रतिक्विंटल पंधराशेपासून चार हजारांवर पोहोचले आहेत. कांद्याचे भाव वधारल्यानंतर बियाण्याचे भावही चक्क तिप्पट- चौपट वाढले आहेत. 

एकदम भाव कसे वाढतात? 
कांद्याचे घरगुती बियाणे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नसते. बरेच शेतकरीही बियाणे तयार करण्याकडे दुर्लक्ष करतात. जे तयार करतात त्यांच्याकडून प्रमाणित बियाणे नाही म्हणून कमी भावात मागणी असते. मात्र बियाणे कंपनीकडून मागणी वाढते. गेल्या महिन्यात हजार ते पंधराशे छापील किंमत असलेले बियाणे चक्क दुप्पट व तिप्पटीने छापून विक्री होत आहे. संबंधित कंपन्यांचे भाव एकदम कसे वाढले, याची विचारणा शेतकरी करू लागले आहेत. दरम्यान, अद्याप पावसाचे प्रमाण वाढतेच आहे. पाण्याचे सर्व स्त्रोत तुडुंब भरले आहेत. कांद्याची वाढीव लागवड करण्यासाठी बियाणे आवश्यक आहे. शेतकरी स्वस्त बियाणे मिळेल का, याचा शोध घेत दूरवर भटकंती करीत आहेत. 


बियाणे प्रकार / गेल्या महिन्यातील भाव / आताचे भाव 
रांगडा कांदा १२०० ते १८०० / ३१०० ते ३८०० 
पांढरा कांदा ८०० ते १४०० / १८०० ते २५०० 
घरगुती बियाणे ६०० ते १०००/१७०० ते २५०० 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top