"वेटिंग लिस्ट'वरचे जावई...धोंड्याच्या सन्मानापासून राहणार वंचित ! 

जगन्नाथ पाटील 
Wednesday, 3 June 2020

अधिक मासात मूर्ती प्राणप्रतिष्ठा, गृहारंभ, प्रवेश, वास्तुशांती, उपनयन, तीर्थयात्रा व इतर मंगलकार्य करू नयेत, तर श्रीकृष्णाची भक्ती, पूजाअर्चा, तीर्थस्नान, व्रतवैकल्ये करणे पुण्यकर्म असल्याचे मानले जाते. 

कापडणेः "कोरोना'च्या संकटाने यंदा विवाहेच्छूंचा हिरमोड तर झालाच; पण धोंड्याच्या अर्थात अधिक महिन्यात नवविवाहित जावयांना जो मानसन्मान आणि भेट मिळाली असती त्यावरही या "वेटिंग लिस्ट'वरच्या जावयांना पाणी सोडावे लागणार आहे. साधारण 80 टक्के विवाह कोरोनामुळे रद्द झाल्याने आनंदावर विरजण पडणाऱ्या वागदत्त वरांची संख्याही मोठी आहे. 

तीन वर्षांनी येतो अधिक मास 
हिंदू पंचांगानुसार 32 महिन्यांनंतर अर्थात साधारणतः तीन वर्षांनी अधिक मास येत असल्याचे म्हटले जाते. यावर्षी अधिक मास 18 सप्टेंबरला सुरू होईल आणि 16 ऑक्‍टोबरला संपणार असल्याचे पुरोहित दुर्गेश जोशी यांनी सांगितले. अधिक मासात मूर्ती प्राणप्रतिष्ठा, गृहारंभ, प्रवेश, वास्तुशांती, उपनयन, तीर्थयात्रा व इतर मंगलकार्य करू नयेत, तर श्रीकृष्णाची भक्ती, पूजाअर्चा, तीर्थस्नान, व्रतवैकल्ये करणे पुण्यकर्म असल्याचे मानले जाते. 

जावयांना मास्क, सॅनिटायझर? 
अधिक मासात दान देण्याची प्रथा रूढ आहे. विशेष म्हणजे नवविवाहित जावयाचा सन्मान आणि दान (भेट) देण्यासाठी खानदेशी सरसावतात. शिवाय तुपात तळलेले अनारसे, पुरणाचे धिंड अर्थात धोंड्याचा पाहुणचार दिला जातो. ज्याच्या-त्याच्या आर्थिक कुवतीप्रमाणे तांब्याचे घंगाळे, घड्याळ, सोन्याची अंगठी, ड्रेस, चांदीची भांडी आदी वस्तूही दिल्या जातात. काळाबरोबर यात मोबाईलचाही समावेश झाला आहे. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक काळ टिकेल असा अंदाज असल्याने जावयांना मास्क, सॅनिटायझर, अर्सेनिक-30, पीपीटी किट हमखास मिळेल, अशी खुमासदार चर्चा सध्या सुरू आहे. कालाय तस्मै नमः दुसरे काय?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news kapdne Son-in-law on the waiting list,will be deprived of the honor !