
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५० वऱ्हाडी उपस्थित राहणार आहेत. यामुळे खर्चात बरीच बचत होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे, तर हौशी मंडळींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
कापडणे : खानदेशात कार्तिकी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुवारी सायंकाळी गावागावांत खोपडीचे पूजन आणि तुलसीविवाह लावण्यात आला. त्यामुळे आज पासून विवाहाचे बार उडणार आहेत. पन्नास वऱ्हाडींना परवानगी असल्याने लॉकडाउनमध्ये थांबविलेल्या आणि आठ महिन्यांपासून वेटिंगवर असलेल्या वधू-वरांना विवाहाची संधी उपलब्ध झाली आहे. २७ नोव्हेंबर सर्वांत मोठी तिथी आहे.
खानदेशात आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीदरम्यान विवाह बंद असतात. कार्तिकी एकादशीला उसाच्या खोपडीचे प्रत्येक भाऊबंदकीत सार्वजनिक पूजन होते अन् दुसऱ्या दिवसापासून विवाहाचा धूमधडाका सुरू होत असतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५० वऱ्हाडी उपस्थित राहणार आहेत. यामुळे खर्चात बरीच बचत होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे, तर हौशी मंडळींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
कापसाला मिळणार साडेसहा हजारांचा भाव
कार्तिकी एकादशीला उसाच्या खोपडीचे पूजन झाल्यानंतर लहान मुलाला खोपडीत बसविले जाते. त्याला शेतमालाचे भाव विचारण्याची परंपरा आहे. कापसाला साडेसहा हजार, बाजरी, ज्वारी, मका, गहू यांना अनुक्रमे प्रतिक्विंटल एक हजार सातशे, अडीच हजार, एक हजार आठशे आणि दोन हजारांच्या भावाचा अंदाज वर्तविला. कापसाचे भाव अधिक वाढणार असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे