esakal | आला वारा... उलटली बोट.. अन्‌ 15 जण बुडाले; उच्छल येथील दुर्घटना
sakal

बोलून बातमी शोधा

ukai dam

आला वारा... उलटली बोट.. अन्‌ 15 जण बुडाले; उच्छल येथील दुर्घटना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवापूर : महाराष्ट्र- गुजरात सीमावर्ती भागातील उच्छल येथील तापी नदीच्या ‘बॅकवॉटर’मध्ये बोट उलटून १५ जण बुडाले. त्यात स्थानिक ग्रामस्थ व मासेमारी करणाऱ्या लोकांनी सहा जणांचे प्राण वाचविले; एका बालिकेचा घटनास्थळी बुडून मृत्यू झाला, तर आठ जण बेपत्ता आहेत. या घटनेत नवापूर तालुक्यातील दोन जणांचा समावेश असल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिली. 

आज दुपारी चारच्या सुमारास तापी नदीच्या उकाई धरणातील ‘बॅकवॉटर’जवळील भिंतखुद गावाजवळ ही घटना घडली. बचावकार्य सुरू झाले असून, अंधार पडल्याने बचावकार्याला अडचणी येत आहे. पोलिस प्रशासन, महसूल विभागाचे अधिकारी, सुरत येथील अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे. 

होळीची सुटी असल्याने गुजरातच्या उच्छल तालुक्यातील सुंदरपूर येथील परिवार सहलीसाठी उकाई धरणात बोटिंग करण्यासाठी गेले होते. भिंतखुद गावाजवळ वेगाने वारा आल्याने बोट अनियंत्रित झाल्याने दुर्घटना झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. यावेळी मोठ्या प्रमाणात वाचवा वाचवा आरडाओरड होत असल्याने नजीकच्या गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांना घटनेचे गांभीर्य कळले होते. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उड्या मारल्या. त्यांनी सहा जणांना पाण्यातून बाहेर काढून प्राण वाचविले. सुंदरपूर गाव नवापूर शहरापासून पाच किलोमीटरवर आहे. सुंदरपूर गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत नवापूर तालुक्यातील दोन जणांचा समावेश आहे. 

संपुर्ण परिवार बुडाला 

एंजल्स कोकणी (वय १५), राकेश बळीराम कोकणी (वय ३२, रा सुंदरपूर ता.उच्छल जिल्हा तापी गुजरात) या दोन्ही पिता-पुत्राचा मृत्यू झाला आहे. राकेश हे भारतीय स्टेट बँकेत शिपाई म्हणून नोकरी करीत होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब पाण्यात बुडाले. 

मयत झालेल्यांची नावे 

विकास राजू गामित (वय २० रा वणझारी ता.उच्छ्ल ), सुमित पारध्या गामित (वय २२, रा. भींतखुद ता.उच्छ्ल), दिनेश देवाजी वळवी (वय २८, रा. वणझारी ता. उच्छ्ल), जिग्नेश नारू कोकणी (वय २०, सुंदरपूर ता.उच्छल), याकुब भीमसिग कोकणी (वय २८, रा.सुंदरपूर), संजना कोकणी (वय १४), अभिषेक कोकणी (वय १२), आराहण कोकणी (वय ०९), उर्मिला कोकणी (वय २२), विनोद बुध्या कोकणी (वय १८, सर्व रहणार सुंदरपूर).