त्या कोरोनाग्रस्त महिलेचा मुक्ताईनगरात 13 दिवस मुक्काम; संपर्कातील चौदा जण क्‍वारंटाईन 

दीपक चौधरी
Sunday, 26 April 2020

कोरोनाग्रस्त महिलेचा मुक्‍ताईनगर तालुक्‍यात तेरा दिवस मुक्‍काम असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे महिलेच्या संपर्कात कोण कोण आले होते; याचा तपास करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे.

मुक्ताईनगर : मलकापूर येथील एका 64 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट प्राप्त झाला आहे. यासह भुसावळ येथील एक जणाला देखील लागण झाल्याचा अहवाल आहे. यामुळे सेफ झोनमध्ये असलेले भुसावळ, मुक्‍ताईनगर तालुके देखील हादरले आहेत. मुख्य म्हणजे मलकापूर येथील कोरोनाग्रस्त महिलेचा मुक्‍ताईनगर तालुक्‍यात तेरा दिवस मुक्‍काम असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे महिलेच्या संपर्कात कोण कोण आले होते; याचा तपास करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. 
जळगावात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळल्यानंतर संपुर्ण जिल्हा हारदला होता. मात्र तो रूग्ण बरा होवून घरी परतल्यानंतर जिल्हा ग्रीन झोनमध्ये येण्याकडे वाटचाल सुरू होती. मात्र अमळनेरमधून एका मागून एक पॉझिटीव्ह रूग्ण येवून संख्या चौदावर पोहचली होत. यात भुसावळ आणि मलकापूर येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. यामुळे जळगाव जिल्ह्याची परिस्थिती आता रेडझोनकडे जाण्याची निर्माण झाली आहे. यात मलकापूर मधील एक 64 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याने मलकापूरसह मुक्‍ताईनगर तालुका देखील हादरला आहे. कारण, त्या महिलेचा तेरा दिवस मुक्‍ताईनगरमधील मुक्‍कामाने किती जणांना बाधीत केले; हे सांगणे सध्या तरी शक्‍य नाही. यामुळे त्यांचा शोध घेणे सुरू आहे. 

चौदा जणांना क्‍वारंटाईन 
सदर महिला 13 दिवस आपल्या भाच्याकडे मुक्ताईनगर तालुक्‍यातील मन्यारखेडा येथे मुक्कामी होती. तेथे त्रास जाणवत असल्याने भाच्याने महिलेला दवाखान्यात भरती केले. यामुळे तालुका वैद्यकीय अधिकारी निलेश पाटील यांच्या पथकाने महिलेच्या भाच्यासह महिलेचा संपर्कात आलेल्या घरातील 14 सदस्यांना क्‍वारंटाईन केले आहे. यात 5 पुरुष, 6 महिला व 1 लहान मुलगा व 1 मुलीचा समावेश आहे. या सर्वांना तपासणीसाठी जळगाव येथे नेण्यात आले 

 

जळगावात खासगी डॉक्‍टराकडे उपचार

मलकापूर येथील कोरोना पॉझिटिव्ह 65 वर्षीय महिला ताप व खोकला आल्याने मलकापूरहुन 20 एप्रिल रोजी मूलगा व सून यांच्यासोबत तालुक्यातील मन्यारखेडा येथील नातेवाईकाच्या ओमनी गाडीने  जळगांव येथे एका खाजगी दवाखान्यात उपचारार्थ गेली होती  .तेथे दवाखान्यात त्या महिलेचा दुसरा मुलगा, सून व नातवंडे हे देखील बघण्यासाठी गेले होते .खाजगी डॉक्टर ने त्यांना जळगांव सामान्य रुग्णालयात पाठविले . त्यानंतर जळगांव नातेवाईकाकडे मुक्कामी रहात ही महिला दि 21 रोजी रिक्षाने पुन्हा त्याच खाजगी दवाखान्यात गेली . तिला सिटीस्कँन काढण्याचा सल्ला दिला परत ती महिला  रिक्षाने सामान्य रुग्णालयात गेली .21 रोजी सदर महिलेचे थुंकीचे नमुने (स्वब) घेतले .सदर नमुने घेतल्यानंतर महिलेचा कोरोना अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला . मात्र ही महिला दवाखान्यात जाण्याआधी मुक्ताईनगर तालुक्यातील 300 लोकवस्ती असलेल्या मण्यार खेडा गावात ओमनी चालक भाचा असलेल्या नातेवाईकाकड़े 13 दिवस मुक्कामी होती. ही वार्ता 26 रोजी तालुक्यातील रुईखेडा व मन्यारखेडा परिसरात पोहोचताच गावकऱ्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

गावात संचारबंदी 
"कोरोना पॉझिटिव्ह महिला मन्यारखेडा गावात रहिवास करून गेल्याची माहिती मिळताच पूर्ण मन्यारखेडा गाव व रुईखेडा परिसर बंद करण्यात आले असून बाहेरच्या व्यक्तींना गावबंदी करण्यात आली असल्याची माहिती रुईखेडा - मन्यारखेडा गृप ग्रामपंचायतचे सरपंच वासुदेव बढे यांनी सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news malkapur women corona positive and muktainagar 13 day stop women