राज्यातील पहिला मांजरपाडा प्रकल्प पूर्ण, छगन भुजबळांच्या हस्ते उद्या जलपूजन 

live
live

नाशिक ः पश्‍चिमेचे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविणाऱ्या आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा "ड्रीम प्रोजेक्‍ट' देवसाने (मांजरपाडा) प्रकल्पाच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले. बोगद्यातून पाणी वाहून पुणेगाव धरणात येण्यास सुरवात झाली. या पाण्याचे जलपूजन उद्या (ता. 25) सकाळी अकराला देवसाने येथे श्री. भुजबळांच्या हस्ते होईल. आमदार नरहरी झिरवाळ, पंकज भुजबळ हे उपस्थित राहतील. गुजरातसह समुद्रामध्ये वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणारी ही राज्यातील पहिली योजना आहे. 
दुष्काळाग्रस्त येवला व चांदवडसह दिंडोरी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी या प्रकल्पामुळे जलसंजीवनी मिळणार आहे. पश्‍चिम वाहिनी नद्यांचे पाणी अडवून ते वळण योजनांद्वारे पूर्व वाहिनी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी श्री. भुजबळांच्या प्रयत्नामुळे जलसंपदा विभागाने 24 नोव्हेंबर 2006 ला मांजरपाडा या महत्वाकांक्षी योजनेला मंजुरी दिली. पश्‍चिम वाहिनी-पूर्व वाहिनी खोरे दुभाजक रेषेच्या पश्‍चिमेला वाहणारे छोटे नाले तीव्र उतार सुरु होण्याआधी छोटे बंधारे बांधून अडविणे. त्यांचा सांडवा पूर्व बाजूला करुन त्यावरुन वाहून जाणारे पाणी कालव्याद्वारे पूर्वेला गोदावरी खोऱ्यात वळवणे असे प्रकल्पाचे स्वरूप आहे. मांजरपाडा वळण योजनेतंर्गत देवसाने गावाच्या खाली पाणी अडवून ते बोगद्याद्वारे प्रवाही पध्दतीने पुणेगांव धरणाच्या वरील बाजूस उनंदा नदीत सोडण्यात आले. योजनेद्वारे 606 दशलक्ष घनफूट पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येणार आहे. शिवाय स्थानिक वापरासाठी पाणी राखीव ठेवण्यात आले. 

कारागृहातूनही भुजबळांचा रेटा 
मांजरपाडा वळण योजनेसाठी भुजबळांच्या प्रयत्नामुळे कमी कालावधीत वनविभागाच्या जमीन मान्यता मार्गी लागली. खासगी जमीन संपादित करताना सरळ खरेदी पद्धतीने चांगल्या दराने जमीन संपादित केल्याने स्थानिक शेतकऱ्यांचा लाभ झाला. 2014 पर्यंत आघाडी सरकारच्या काळात बोगद्याचे काम 90 टक्के पूर्ण झाले. मात्र 2014 मध्ये राजकीय हेतूने उर्ध्व गोदावरी प्रकल्पाची चौकशी करत प्रकल्पाचे काम रखडवण्यात आल्याचा आरोप होत आहे. चौकशीसाठी "मेरी'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची राज्य तांत्रिक समिती नेमली. भुजबळांच्या प्रयत्नामुळे मांजरपाडाच्या उर्वरित कामांसाठी 70 कोटींची तरतूद करून ठेवली होती. सत्ता परिवर्तनानंतर ही रक्कम इतरत्र वळविण्यात आली. दरम्यान,भुजबळ कारागृहात असल्याने तेथूनही कामासाठी त्यांचा सतत रेटा सुरु होता. त्यामुळे सरकारला प्रकल्पाला तृतीय प्रशासकीय मान्यता द्यावी लागली. भुजबळांनी सतत प्रकल्पाचा आढावा घेतला. त्यामुळे जूनमध्ये बोगद्याचे काम पूर्ण झाले. भुजबळांचा प्रकल्प म्हणून काम बंद पडले नसते, तर 3 वर्षापूर्वीच पाणी दुष्काळग्रस्त तालुक्‍यात आले असते. 

दिंडोरी, चांदवड, येवल्यासाठी फायदा 
मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी पुणेगाव धरणातून पुणेगाव डाव्या कालव्याद्वारे 63 किलोमीटरवरील दरसवाडी प्रकल्पात जाईल. दरसवाडी कालव्यातून 88 किलोमीटरवरील डोंगरगांव पोहोच कालव्यात म्हणजे एकूण 154 किलोमीटरच्या प्रवासाने हे पाणी डोंगरगाव तलावात टाकण्याचे नियोजन आहे. कालव्यातून चांदवड तालुक्‍यातील 5 व येवल्यातील 35 पाझर तलावासह 2 लघु पाटबंधारे प्रकल्प भरण्यात येतील. प्रकल्पामुळे दिंडोरीतील सिंचनाला फायदा झाला आहे. शिवाय चांदवडमधील 63 किलोमीटर आणि येवल्यातील 88 किलोमीटरमधील अनेक गावांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे.. 

प्रकल्पाच्या ठळक बाबी 
मांजरपाडा धरणाची एकूण लांबी ः 3 हजार 450 मीटर 
समुद्र सपाटीपासून धरणमाथा पातळी ः 722 मीटर 
पूर्णसंचय पातळी ः 718 मीटर आहे 
अडवलेले नाले ः 12 
जोड आणि वळण बोगदा लांबी ः 10.16 किलोमीटर 
उनंदा नदीत हस्ते जवळ पाणी सोडण्यासाठी चर ः 3.20 किलोमीटर 
वळण योजनेसाठी संपादित जमीन ः 64.24 हेक्‍टर वन आणि 30.18 हेक्‍टर खासगी 
योजनेची किंमत ः 328 कोटी 45 लाख 
पुणेगाव धरणाद्वारे पाणी वितरित होणारे तालुके ः चांदवड व येवला 
आगामी काळात पार गोदावरी नदीजोड प्रकल्पाद्वारे वळविले जाणारे पाणी सुद्धा याच बोगद्याद्वारे पोचणार गोदावरी खोऱ्यात 

महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष सुरु 
स्थानिकांच्या मागणीनुसार नदीवर तीन पूल, दोन बंधारे व गावतळयांची तरतूद आहे. तसेच मांजरपाडा वळण योजनेचे सरकारने नांव बदलून देवसाने वळण योजना (ता.दिंडोरी) असे केले. पश्‍चिमेला समुद्रात आणि गुजरातमध्ये वाहून जाणारे पाणी अडवून ते वळण योजनेद्वारे बोगद्यातून पूर्वेकडे पुणेगावमध्ये आणणे ही 13 वर्षापूर्वीची स्वप्नवत वाटणारी योजना साकारल्याचा आनंद आहे, असे सांगून भुजबळ म्हणाले, की जिल्ह्यातील दमणगंगा, नार-पार खोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात उपलब्ध पाणी नदीजोड प्रकल्पांद्वारे पूर्वेकडे अतितुटीच्या गिरणा व गोदावरी खोऱ्यात वळवले जावे यासाठी आपला संघर्ष सुरु आहे. दमणगंगा व नार-पार खोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रातील महाराष्ट्राच्या हद्दीतील संपूर्ण पाण्यावर महाराष्ट्राचा हक्क अबाधित राहावा व ते पाणी गुजरातमध्ये जाऊ न देता महाराष्ट्रात वळवावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com