दुर्मिळ पांढरा नागाला मिळाले जीवनदान; सर्पमीत्राने शिताफीने पकडून सोडले जंगलात

फुंदीलाल माळी
Friday, 18 December 2020

दोन ते अडीच फूट लांबीच्या पांढऱ्या रंगाचा अतिविषारी नाग असल्याचे त्यांना समजले. त्यांनी शिताफीने नागाला सुखरूप पकडले आणि वन्यजीव संरक्षण संस्थेशी संपर्क केला.

 तळोदा ः निमगूळ येथे रवींद्र पाटील यांच्या घरात दुर्मिळ पांढरा नाग (अल्बिनो) बुधवारी दुपारी आढळला. या नागाला नंदुरबारच्या वन्यजीव संरक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांनी शिताफीने पकडून त्याला जीवनदान दिले. निसर्गात पांढरा नाग दुर्मिळ असल्याने नागरिकांनी नागाला पाहण्यासाठी गर्दी केली होती. 

आवश्य वाचा- भारत- पाकिस्तान युद्धातील वीर जवानाकडून शौर्य पदके परत; काय आहे कारण वाचा सविस्तर..

 

रवींद्र पाटील यांच्या घराशेजारील जुन्या विहिरीजवळ पांढऱ्या रंगाचा साप असल्याचे सर्पमित्र महेंद्र बागल यांना कळले. ते घटनास्थळी पोचल्यावर दोन ते अडीच फूट लांबीच्या पांढऱ्या रंगाचा अतिविषारी नाग असल्याचे त्यांना समजले. त्यांनी शिताफीने नागाला सुखरूप पकडले आणि वन्यजीव संरक्षण संस्थेशी संपर्क केला. संस्थाध्यक्ष सागर निकुंभे व पदाधिकारी घटनास्थळी पोचले. त्या नागाची शहादा वन विभागात नोंद करण्यात आली. नागाची तपासणी करून निसर्गात मुक्त करण्यात आले. 

पांढऱया नागाचे आयुष्य कमी

इतर सापांच्या तुलनेत रंगहीन सापांचे आयुष्यमान कमी असते. कारण या सापांना जास्त थंडी व उन्हाचा खूप त्रास होतो. त्यांच्या जीवनमानावर दुष्परिणाम होतो. त्वचेचा रंग पिवळसर पांढरा असल्याने हे साप सहज शत्रूच्या नजरेस पडतात आणि शिकार होतात. 

आवर्जून वाचा- पोलिसांनी हटकल्याचा राग रिक्षाचालकाने केले चक्क अपहरण

 
सापाचा रंग त्वचेतील मेलानीन या घटकावर अवलंबून असतो. त्वचेतील मेलानीन जितके जास्त तितका सापाचा रंग गडद दिसतो. रंगहीन सापांमध्ये मेलानीन हा घटक खूपच कमी प्रमाणात असतो. त्यामुळे या सापांचा रंग फिकट दिसतो. डोळे आणि जीभ लाल किंवा गुलाबी रंगाची असते. सापाच्या मूळ रंगाच्या जागी पांढरा पिवळसर रंग येतो आणि अशा वेळी साप कोणत्या प्रजातीचा आहे, हे ओळखणे कठीण होते. 
-अविनाश पाटील, सर्प अभ्यासक, वन्यजीव संरक्षण संस्था, नंदुरबार  

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nadurbar taloda caught rare white cobra