esakal | बंदुकीचा धाक दाखवून साडेपंधरा लाख लंपास 
sakal

बोलून बातमी शोधा

बंदुकीचा धाक दाखवून साडेपंधरा लाख लंपास 

नोकर उमेदसिंगला बांधून बंदुकीचा धाक दाखवीत कार्यालयातील रोकड लुटून नेली. आठ वाजून २४ मिनिटाला दरोडेखोर कार्यालयाबाहेर लूट करून निघताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले. 

बंदुकीचा धाक दाखवून साडेपंधरा लाख लंपास 

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार  ः शहरातील अत्यंत गजबजलेल्या गणपती मंदिर परिसरातून डी. सी. डेव्हलपर्सच्या कार्यालयातील नोकराला दोघांनी बंदुकीचा धाक दाखवून १५ लाख ६९ हजार लांबविल्याची घटना बुधवारी (ता. १९) सकाळी आठला घडली. या प्रकरणी नोकरावर संशयाची सुई असून, चौघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 


दरम्‍यान, शहरात बांधकाम व्यावसायिकाच्या घरात रात्री चोरी झाल्याचे उघडकीस येऊन चार लाख लांबविल्याची माहिती समोर आली. 
शिवसेनेचे पदाधिकारी व बांधकाम व्यावसायिक देवेंद्र चंदनमल जैन यांचे शहरातील गणपती मंदिर परिसरात डी. सी. डेव्हलपर्स नावाचे बांधकाम क्षेत्राशी निगडित असलेले कार्यालय आहे. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास दोन जण कार्यालयात बळजबरीने प्रवेश करीत कर्मचारी उमेदसिंग याच्या डोक्याला बंदूक लावून हातपाय व तोंड चिकटपट्टीने बांधून त्याला कार्यालयाच्या किचनमध्ये कोंडले. त्यानंतर दोघा दरोडेखोरांनी कार्यालयातील विविध टेबलाच्या गल्ल्यात ठेवलेले १५ लाख ६९ हजार रुपये घेत पोबारा केला. 


या घटनेची माहिती परिसरात पसरताच बघ्यांची मोठी गर्दी झाली. दरोड्याची वार्ता पूर्ण शहरात पसरली. बांधकाम व्यावसायिक देवेंद्र जैन यांना माहिती मिळताच ते कार्यालयात आले. त्यांनी पोलिस ठाण्यात कळविल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेतल्यानंतर पोलिसांनी ठसेतज्‍ज्ञ व श्वान पथकाला पाचारण केले. ठसेतज्‍ज्ञांनी कार्यालयातील विविध भागांचे ठसे घेतले. घटनास्‍थळी जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक रमेश पवार, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर नवले यांनी भेट देऊन पाहणी केली. 

आठ मिनिटांत लूट; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद 
बुधवारी सकाळी डी. सी. डेव्हलपर्सच्या कार्यालयात दोघांनी सकाळी आठ वाजून १६ मिनिटाला बळजबरीने प्रवेश केला. त्यानंतर नोकर उमेदसिंगला बांधून बंदुकीचा धाक दाखवीत कार्यालयातील रोकड लुटून नेली. आठ वाजून २४ मिनिटाला दरोडेखोर कार्यालयाबाहेर लूट करून निघताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले. 

सरस्वती कॉलनीतही चोरी 
दरम्‍यान, बांधकाम व्यावसायिक विक्रमसिंग राजपूत यांच्या सरस्वती कॉलनीतील घरात रात्री चोरी झाली असून, चार लाख रुपये लंपास झाले आहेत. दोन्ही घटनेतील संशयित एकच असून, त्‍या दिशेने पोलिस तपास करीत आहेत. 

नोकराचा हात असल्याचा संशय 
डी. सी. डेव्हलपर्सचा कार्यालयातील नोकर उमेदसिंग यानेच मित्रांच्या‍ मदतीने बनाव केल्याची संशयाची सुई असून, याबाबत पोलिस तपास करीत आहेत. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक देवेंद्र जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात नोकर उमेदसिंग, भगतसिंग ऊर्फ भगू (उमेदसिंगचा मित्र)(रा. राजस्थान) व दोन अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

संपादन-भूषण श्रीखंडे