सर आली धावून, रस्ता गेला वाहून !

सम्राट महाजन
Monday, 31 August 2020

पावसामुळे या मार्गावरील नाल्याजवळील अर्धापेक्षा अधिक रस्त्याचा भाग वाहून गेल्याने परिसरातील नागरिक व वाहनधारकांची मोठी पंचाईत झाली आहे. त्यांना आता इप्सितस्थळी पोचण्यासाठी फेरा मारावा लागणार आहे. 

तळोदा  : तालुक्यात २५ दिवसांपासून संततधार सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे. शनिवारी (ता. २९) तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यात आमलाड ते धानोरादरम्यान एका ठिकाणी रस्ता वाहून गेला. त्यामुळे तेथे भला मोठा खोलगट भाग तयार झाला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी पंचाईत झाली. काही नागरिक जीव धोक्यात घालून या मार्गावरून प्रवास करीत आहेत. मात्र, पावसाचा जोर वाढला व रस्त्यावरून पाणी वाहायला लागले, तर रात्री-अपरात्री वाहून गेलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने वेळीच रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा वाहनधारकांनी व्यक्त केली आहे. 

या मार्गावर धानोरा, खेडले, तऱ्हावद, कार्थदे आदी गावांतील ग्रामस्थ रोज दैनंदिन अथवा शेतीचा कामांसाठी ये-जा करीत असतात. काही वाहनधारक तळोदा-प्रकाशा-शहादा महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक लक्षात घेत धानोरा-तऱ्हावद मार्गावरून पुढे प्रकाशा व शहादा या ठिकाणी जातात. त्यामुळे रोजच आमलाड-खेडले रस्त्यावरूनही दुचाकी व चारचाकी वाहनांची ये-जा सुरू असते. शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे या मार्गावरील नाल्याजवळील अर्धापेक्षा अधिक रस्त्याचा भाग वाहून गेल्याने परिसरातील नागरिक व वाहनधारकांची मोठी पंचाईत झाली आहे. त्यांना आता इप्सितस्थळी पोचण्यासाठी फेरा मारावा लागणार आहे. 

गेल्या वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था 
ज्या ठिकाणचा रस्ता शनिवारी वाहून गेला, त्या ठिकाणचा व आसपासचा रस्ता गेल्या वर्षीही पावसाळ्यात खराब झाला होता. त्या वेळी संबंधित विभागाने फक्त थातूरमातूर काम करून दुरुस्ती केली होती. आता जवळपास रस्त्याचा अर्धा हिस्साच वाहून गेल्याने तेथे भला मोठा खोलगट भाग तयार झाला आहे. रस्त्यावरून पाणी वाहत असल्यास एखाद्या वाहनधारकाला योग्य अंदाज न आल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे संबंधित विभागाने वेळीच रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

पाण्याचा निचरा होणे आवश्यक 
दर वर्षी पावसाळ्यात या रस्त्यांच्यावरून पावसाचे पाणी वाहत आसपासच्या शेतशिवारात घुसते. आमलाड ते धानोरादरम्यान दोन नाले येतात, तर पुढे खेडल्यापर्यंत आणखी तीन ते चार नाले आहेत. अपवाद वगळता या सर्व नाल्यांतील पाण्याचा योग्य प्रमाणात निचरा होत नाही. दर वर्षी चांगला पाऊस झाल्यावर पाणी रस्त्यांवरून शेतशिवारात शिरते. नागरिक व शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक प्रयत्न व्हायला हवेत. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nanadurbar Heavy rains washed away the road at a place on the road from Amalad to Dhonara