स्थलांतर रोखण्यासाठी रोजगारनिर्मितीचे प्रयत्न करा !

धनराज माळी
Wednesday, 4 November 2020

कुक्कुटपालन, शेळीपालन आणि मत्स्यपालनाला प्रोत्साहन देण्यात यावे. नागरिकांना त्यासाठी असलेल्या योजनांची माहिती द्यावी. स्थलांतराची नोंद ग्रामपंचायत स्तरावर घ्यावी.

नंदुरबार : जिल्ह्यातील स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती करण्याचे प्रयत्न विविध यंत्रणांनी करावेत, असे आवाहन आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी /यांनी केले. 

वाचा- अरेच्चा : गावराण अंडीसाठी करावे लागते अ‍ॅडव्हान्स बुकींग; दोन आठवड्यांची वेटींग ! 

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा वळवी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ आदी उपस्थित होते. 

ॲड. पाडवी म्हणाले, की ग्रामीण भागात पाझर तलावाची कामे मोठ्या प्रमाणात घ्यावीत. यामुळे पाणीसाठा वाढण्यास मदत होईल आणि नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल. वन विभागाने वनाच्छादन वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. जंगलातील उत्पादनाच्या माध्यमातून दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना रोजगार मिळू शकेल. आयुर्वेदिक औषधाच्या दृष्टीने उपयुक्त वनस्पतींची लागवड करावी. आदिवासी बांधवांना जंगलाच्या माध्यमातून उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी वनधन केंद्राची स्थापना करावी. 
ते म्हणाले, की कुक्कुटपालन, शेळीपालन आणि मत्स्यपालनाला प्रोत्साहन देण्यात यावे. नागरिकांना त्यासाठी असलेल्या योजनांची माहिती द्यावी. स्थलांतराची नोंद ग्रामपंचायत स्तरावर घ्यावी. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीने यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश त्यांनी दिले. पालकमंत्र्यांनी रापापूर, उमराणी आणि रामपूर प्रकल्पाबाबत नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nanadurbar stop the migration of workers, the Guardian Minister K. C. Review meeting conducted by Padvi