esakal | नंदुरबार जिल्ह्यात २७३ कोटींचे पीककर्जवाटप 
sakal

बोलून बातमी शोधा

नंदुरबार जिल्ह्यात २७३ कोटींचे पीककर्जवाटप 

वर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पीककर्जवाटपाचे प्रमाण वाढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या निर्देशानुसार तालुकास्तरावर मेळावे घेण्यात आले.

नंदुरबार जिल्ह्यात २७३ कोटींचे पीककर्जवाटप 

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार  : जिल्ह्यात यंदा २५ हजार २१० शेतकऱ्यांना २७३ कोटी नऊ लाख रुपयांचे पीककर्जवाटप करण्यात आले. ही रक्कम एकूण उद्दिष्टाच्या ४४ टक्के असून, गेल्या वर्षीपेक्षा ४५ कोटींनी जास्त आहे. 

जिल्हा मध्यवर्ती बँकेने सर्वाधिक १२ हजार ८५६ शेतकऱ्यांना ८२ कोटी १० लाख कर्जवाटप केले आहे. ग्रामीण बँकेने ४८७ शेतकऱ्यांना चार कोटी ९६ लाख, तर खासगी बँकांनी ७९२ शेतकऱ्यांना २१ कोटी ५० लाख, तर राष्ट्रीयीकृत बँकांनी ११ हजार ७५ शेतकऱ्यांना १६४ कोटी ५३ लाखांचे पीककर्जवाटप केले आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामात १५ हजार २९३ शेतकऱ्यांना २२८ कोटी ३५ लाख अर्थात उद्दिष्टाच्या ३९ टक्के पीककर्जवाटप केले होते. 

या वर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पीककर्जवाटपाचे प्रमाण वाढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या निर्देशानुसार तालुकास्तरावर मेळावे घेण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना कर्जवाटप वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रशासनातर्फे बँकांकडे पीककर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे कर्जवाटपाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

यापुढील काळातही कर्जवाटप वाढविण्यासाठी बँकांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे. लीड बँक व्यवस्थापकांनी प्रत्येक आठवड्यात पीककर्जवाटपाचा आढावा सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांना पीककर्ज घेण्यासाठी समस्या येत असल्यास, त्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही डॉ. भारूड यांनी केले आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे