दुर्गम भागातील कोरोनाचा संसर्ग साखळी तोडा 

धनराज माळी
Wednesday, 16 September 2020

कोरोना बाधीत व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींची त्वरित स्वॅब चाचणी घेण्यात यावी. ग्रामीण भागातील स्थानिक डॉक्टरांकडील तापाच्या रुग्णाची माहिती घ्यावी.

नंदुरबार : कोरोना प्रतिबंधात्मक उपायांसंदर्भात प्रशासनाने चांगली कामगिरी केली असून यापुढील काळात दुर्गम आणि डोंगराळ भागात कोरोनाचा प्रसार होणार नाही यासाठी विशेष दक्षता घेण्यात यावी, यासाठी सर्व यंत्रणांनी झटून काम करावे तसेच मास्क न वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असे निर्देश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आज येथे दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविश्यांत पंडा, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शैखर रौंदळ आदी उपस्थित होते. 

श्री. गमे म्हणाले, प्रतिबंधित क्षेत्रात अतिजोखमीच्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात यावे. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांकडून नियमाचे कटाक्षाने पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. कोरोना बाधीत व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींची त्वरित स्वॅब चाचणी घेण्यात यावी. ग्रामीण भागातील स्थानिक डॉक्टरांकडील तापाच्या रुग्णाची माहिती घ्यावी. मास्क न घालणाऱ्या व सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्या व्यक्ती विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले. 

आरोग्यसाठी कंत्राटी भरती करा 
रुग्णासाठी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होतील हे पहावे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्तपदाचा आढावा घेऊन कंत्राटी तत्वावर आवश्यक ती पदे त्वरित भरण्यात यावीत. दुर्गम भागात आवश्यकतेनुसार ॲन्टीजन टेस्टचा उपयोग करावा. दररोज किमान ५०० व्यक्तींची स्वॅब चाचणी करण्यात यावी. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या कारणाचे विश्लेषण करुन मृत्यूदर कमी करण्याचा प्रयत्न करावा, असे श्री.गमे म्हणाले. तत्पूर्वी श्री.गमे यांच्या हस्ते चार शासकीय वाहनाचे हस्तांतरण करण्यात आले. 

कोविड रुग्णालयाला भेट 
विभागीय आयुक्तांनी जिल्हा रुग्णालय परिसरातील आरटीपीसीआर लॅब व कोविड हॉस्पिटलला भेट 
देऊन तेथील व्यवस्थेची माहिती घेतली. भविष्यात बाधितांची संख्या वाढल्यास त्यादृष्टीने आवश्यक नियोजनाबाबत 
त्यांनी सूचना दिल्या. 

सिव्हीलमध्ये ऑक्सिजन प्लँन्ट 
विभागीय आयुक्तांनी ई -फेरफार, महाराजस्व अभियान, आधार प्रमाणीकरण, आधार नोंदणी, 
पी.एम.किसान योजना, पीककर्ज वाटप, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना, कापूस खरेदी आदी विविध 
विषयाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी सादरीकरणाद्वारे कोरोनाविषयक केलेल्या उपाययोजनांची आणि 
जिल्ह्यातील महसुली कामकाजाची माहिती दिली. लवकरच जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लँन्टची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandhurbar Divisional Commissioner of Corona of Nandurbar District took stock