esakal | आदिवासींची जीवनशैली हटविणार कोरोना 
sakal

बोलून बातमी शोधा

aadivashi

आदवासींचे जीवन, राहणीमान, दैनंदिन आहार, वन औषधी, वनभाज्या व फळे -फुले यांचे सेवन आणि श्रम तसेच काटक शरीरामुळे त्यांची रोग प्रतिकार शक्ती तेवढीच प्रबळ आहे. त्यामुळे त्यांच्या रोगप्रतिकार शक्तीपुढे आजारांचा टिकाव सहजासहजी लागत नाही हे ही तेवढेच खरे.

आदिवासींची जीवनशैली हटविणार कोरोना 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : रोगप्रतिकार शक्ती चांगली असली तर कोणत्याही आजाराचा शरीरावर लवकर परिणाम होत नाही, हे वैद्यकीय तज्ञांनीही मान्य केले आहे. सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत असून सातपुड्याच्या कुशीतील आदिवासी बांधव प्रकृतीशी जवळीक साध राहत असल्याने कोरोना तेथे शिरकाव करू शकला नाही ही समाधानाची बाब आहे. आदवासींचे जीवन, राहणीमान, दैनंदिन आहार, वन औषधी, वनभाज्या व फळे -फुले यांचे सेवन आणि श्रम तसेच काटक शरीरामुळे त्यांची रोग प्रतिकार शक्ती तेवढीच प्रबळ आहे. त्यामुळे त्यांच्या रोगप्रतिकार शक्तीपुढे आजारांचा टिकाव सहजासहजी लागत नाही हे ही तेवढेच खरे. 
सातपुड्यात राहणारा आदिवासी बांधव आज नागरी सुविधांअभावी अडचणीत आहेत. अनेक गावांमध्ये अजून विकास पोहोचला नसला तरी तेथे आजारांची लागणही पोहोचायला विचार करेल, असे चित्र आहे. आदिवासी बंधूंनी पांरपारिक चाली रिती व त्यांचे जीवनमान, राहणीमान, आहार-विहार या सर्व गोष्टी त्यांनी सांभाळल्या आहेत. 

उपजत, सेंद्रीय धान्याचा वापर 
सातपुड्यात परसबागेसारखे घराजवळच विविध प्रकारच्या भाज्या व फळे यांचे सेंद्रीय पद्धतीने उत्पादन घेतले जाते. त्यातही सर्व बियाणे हे गावरान असतात. त्यामुळे त्याचा दररोजचा जेवणातील वापर हा शरीरासाठी कसदार व चवदार अन्न म्हणून होतो. त्यावर कोणेतही औषधी अथवा खतांचा मारा नसतो. नैसर्गिक उत्पादित अन्न धान्याचा वापर ते करतात. रोजच्या भाज्यांमध्ये डाळींसोबतच वनभाज्या, वनफळे, निसर्गाचे सानिध्य आणि मोकळी हवा हाही त्यांचा उत्तम आरोग्याचा गुरूमंत्र आहे. 

श्रमाची कामे अधिक 
सातपुड्यात कोणतीही रोजगाराचे साधने नाही. शेती व शेत मजुरीसोबतच वन विभाग, रस्त्यांची कामे अशी अतिश्रमाचे कामे येथील रहिवासी मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे शरीराचे व्यायाम होऊन कसदार व पीळदार शरीर बनते. त्यातही बाराही महिने बदलत्या हवामानाचा कोणत्याही त्यांचा शरीरावर परिणाम होत नाही. त्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते. 

वनऔषधी, फळे-फुलांचा वापर 
सातपुड्यातील आदिवासी बांधव आजही आजारांवर वनऔषधींचा उपयोग करतात. त्याबरोबरच जंगलातील फळे , फुले यांचा वापर दैनंदिन आहारातून अथवा कच्चे खाण्यासाठी करतात. त्यामुळे केमिकल असलेल्या मेडिसिनची त्यांना गरज भासत नाही. वनऔषधीच्या वापरामुळे त्यांच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते. 

विखरलेली गाव-पाडे व घरे 
सर्वात महत्वाचे म्हणजे येथील राहणीमानाची पध्दत वेगळी आहे. एकाच ठिकाणी घरे अथवा झोपड्या बनवून ही कुटुंबे राहत नाहीत. येथील गावे पाड्या -वस्त्यांमध्ये विखुरलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाचे घरे लांब लांब अंतरावर आहेत. त्यामुळे मोकळे वातावरण, शुध्द हवामान असते. त्यामुळे शरीर सुदृढ राहते. संसर्गाचाही धाक नसतो. एखाद्याला संसर्गजन्य आजार झाला तरी त्याचा परिणाम एकमेकांवर होत नाही. हा सर्वात महत्वाचा मुद्दा मानला जातो. 

स्थलांतरामुळे संसर्गाची भिती - पाडवी 
सातपुड्यात कोणताही आजार येण्यासाठी त्याला खूपच विचार करावा लागेल असा विश्‍वास येथील रहिवाशांना आहे. मात्र येथे रोजगाराचे साधन नाही म्हणून अनेक कुटुंबे, गुजरात, महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये स्थलांतर करतात. ते सध्या गावाकडे परतू लागले आहेत. त्यामुळे त्यांचापासूनच संसर्गाची भिती आहे. अन्यथा येथे कोणत्याही आजाराला थारा नाही. सध्या कोरोना विषयी भिती नाही मात्र शासन-प्रशासनाचा सूचनांचे पालन येथील रहिवासी काटेकोरपणे करीत आहेत. लोक घराबाहेर पडत नाही, गर्दी टाळताहेत, बाहेरून येणाऱ्यांची काळजी घेतली जात आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती रतन पाडवी यांनी ‘सकाळ' शी बोलतांना दिली.