
अतिदुर्गम भागातील समस्या मोठ्या आहेत. मात्र, प्रशासकीयपातळीवर शक्य तेवढ्या सुविधा देवून लाभार्थ्याना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न सुरु आहे.
- ज्ञानेश्वर सपकाळे, तहसीलदार.
नंदुरबार : धडगाव तालुक्यातील सीमावर्ती, अतिदुर्गम भागातील गावाना पोहोचण्यासाठी धड रस्ते नाहीत; अशा डोंगर माथ्यावर वसलेल्या मांजणीपाडा व मुरवाणीपाडा येथे स्वातंत्र्यानंतर प्रथमच तहसीलदार पोहोचले. तब्बल दहा किमी पायपीट करत तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी पाड्यावर जावून नागरिकांना रेशन कार्डाचे वाटप करत समस्या जाणून घेतल्या. प्रशासनाच्या लोकाभिमुख भूमिकेमुळे आदिवासी बांधव भारावून गेल्याचे चित्र पहायला मिळाले.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. मात्र, तालुक्यातील दुर्गमभातील बऱ्याच नागरिकांकडे आजही रेशन कार्ड नाही. यामुळे अनेक लाभार्थ्यांना शासकीय योजनांपासून वंचीत राहावे लागते. त्यातच अनेकदा कागदपत्रांच्या अपुर्णतेमुळे कार्यालयात खेटे मारूनही रेशन कार्ड मिळण्यास अडचणी निर्माण होता. या सर्व प्रकारात दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांचा वेळ व पैसा दोन्हीही मोठ्या प्रमाणात खर्च होतो. यातून मनस्ताप होवून प्रशासनावरील विश्वास कमी होतो.
गाव पाड्यांवर रस्ते नाही तरीही
तालुक्यातील सीमावर्ती भागात दळण वळणाच्या साधनांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. अनेक गाव पाड्यांवर जाण्यासाठी रस्तेच नाहीत. अशा परिस्थितीत तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या चमूसोबत तब्बल दहा किलोमीटरची पायपीट करत तोरणमाळ ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या झापी ग्रामपंचायतीतील अतिदुर्गम मांजणीपाडा व मुरवाणीपाडा पाड्यावर पोहोचले. सुमारे 450 लोकवस्तीच्या डोंगरमाथ्यावर वसलेल्या मांजणीपाडा व मुरवाणीपाडा या पाड्यांवर पोहोचण्यासाठी जवळपास 38 किलोमिटरच्या प्रवासात तहसिदारांना जीप, बोट व पायी प्रवास करावा लागला.
त्यांनी स्वातंत्र्यानंतर प्रथमच पाहिला अधिकारी
चारही बाजूने जंगल व खोल दरी व डोंगरमाथ्यावर हे पाडे वसलेले आहे. तीव्र चढावाचा डोंगर पायी चढून तहसीलदारांना आपल्या पाड्यावर आलेले पाहून ग्रामस्थांना आश्चर्याचा धक्काच बसला. स्वातंत्र्यानंतर प्रथमच एखादा प्रशासकीय अधिकारी पायपीट करत आपल्या पाड्यावर आल्याने नागरिक भारावून गेले होते. यावेळी सुमारे 150 कुटुंबांना तहसीलदार सपकाळे, जि.प.सदस्य गणेश पराडके यांच्या हस्ते रेशन कार्डाचे वाटप करण्यात आले. तहसिदारांनी पाड्यावर चौफेर फिरून विविध समस्या जाणून घेतल्या.
योजना पोहचविण्याचे आश्वासन
गावात आधार कार्ड नसलेल्या लोकांसाठी आधार कॅम्प लावला जाईल, तसेच वनपट्टे धारकांना लवकरच आदेशांचे वाटप करण्यात येईल. गावात पिण्याच्या पाण्यासाठी विहीर मंजुरीसाठी, गावातील स्वस्त धन्य लाभार्थ्यांना गावातच स्वस्त धन्य दुकान मंजूर करण्यात येईल; तसेच प्रयत्न करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. गावातील नागरिकांनी खावटी योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सारख्या योजनेचा लाभ घ्यावा. मांजणीपाडा व मुरवाणीपाडाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहाय्य केले जाईल असेही सपकाळे यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले. यावेळी तोरणमाळ गटाचे जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश पराडके, विधानसभा संघटक विजय ब्राम्हणे,मंडळ अधिकारी विठ्ठल उकर्डे, मधुकर सूर्यवंशी, अव्वल कारकून मिथुन राठोड, पुरवठा लिपिक पी. एस. ईशी, ग्रामविकास अधिकारी डी. डी. पाटील, तलाठी शांतीलाल आहेर आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्यानंतर प्रथमच तहसीलदार आपल्या चमू सोबत आल्याने प्रशासानावरचा विश्वास दृढ झाला आहे. घरपोहोच रेषा कार्डाचे वाटप केल्याने आता आम्हाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे.
- वडदा भुरका पावरा, ग्रामस्थ मांजणीपाडा. झापी.
संपादन ः राजेश सोनवणे