esakal | दोन बालिकांना सर्पदंश; वेळेवर उपचार न मिळाल्याने एकीचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

snack bite

सर्पदंश झालेल्या बालिकेला वेळेवर औषधोपचार न मिळाल्याने तिचा रस्त्यातच मृत्यू झाला. तर एकीला जेमतेम बांबूच्या झोळीने पोहोचविले तर ती वाचली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

दोन बालिकांना सर्पदंश; वेळेवर उपचार न मिळाल्याने एकीचा मृत्यू 

sakal_logo
By
धनराज माळी

धडगाव (नंदुरबार) : सातपुड्यातील अतिदुर्गम भागात आजही दळणवळणाची सोय अद्याप उपलब्ध झालेली नाही, धड पायवाट नाही, तेथे रस्ता, वीज कसा पोहोचणार. अन् त्याचाच फटका येथील ग्रामस्थांना बसतो आहे. अनेकांना वेळेवर औषधोपचार मिळू शकत नसल्याने आपला जीव गमवावा लागतो आहेत. त्याचा प्रत्यय नुकताच आला. सर्पदंश झालेल्या बालिकेला वेळेवर औषधोपचार न मिळाल्याने तिचा रस्त्यातच मृत्यू झाला. तर एकीला जेमतेम बांबूच्या झोळीने पोहोचविले तर ती वाचली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अनेक पाडे विकासापासून कोसोदूर 
धडगाव -अक्कलकुवा तालुक्यातील अनेक गावांपर्यंत जाण्यासाठी साधी पायवाटही नाही. डोंगर दऱ्या तुडवत येथील पहाड पट्टातील ग्रामस्थांना धडगाव -अक्कलकुवा पर्यंत पोहोचावे लागते. त्यामुळे आरोग्य सेवा पोहोचणे तर दूरच आहे. जिल्ह्याचा व जिल्ह्यातील आदिवासी समाजाचा विकास हा केवळ काही भागापुरताच झाला आहे. त्यामुळे अतिदुर्गम भागातील अनेकांना आरोग्य सेवेअभावी जीव गमवावा लागत आहे. त्याचे जिवंत उदाहारण म्हणजे पलाझाडी (ता. धडगाव) येथील बालिकेचे आहे. 
 
उपचार न मिळाल्याने बालिकेचा मृत्यू 
वेलखेडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पलाझाडी (ता. धडगाव) येथे १७ ऑक्टोबरला अम्रिता लखन पाडवी व मंशाली लखन पाडवी या दोन बालिकांना सर्पदंश झाला होता. जवळपास आरोग्य केंद्राची सुविधा नसल्याने त्यांना बांबूच्या झोळीने धडगाव ग्रामीण रुग्णालयात साधारण २० किलोमीटर पायपीट करत आणावे लागले. त्यात रुग्णालयात पोहचण्याआधी अम्रिता लखन पाडवी (वय ५) या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला व दुसरी बहीण मंशाली वर सध्या धडगाव ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरु आहे. जर दळणवळणाची सोय राहली असती, तर आमची कन्या वाचली असती, अशी भावनिक प्रतिक्रिया लखन पाडवी याने मुलीचा मृत्यूनंतर व्यक्त केली. 
 
संपादन ः राजेश सोनवणे