esakal | विनोदी कलावंत आला पण; रिअल हिरो पाहण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले... 
sakal

बोलून बातमी शोधा

makarand anaspure

नाम फाउंडेशनला यंदाचा पुरुषोत्तम पुरस्कार मिळाल्याने तो स्वीकारण्यासाठी चित्रपट अभिनेता मकरंद अनासपुरे हे शहादा येथे आले होते.

विनोदी कलावंत आला पण; रिअल हिरो पाहण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले... 

sakal_logo
By
संजय मिस्तरी

वडाळी (नंदुरबार) : पडद्यावर दिसणारा हिरो प्रत्यक्षात गावात येत असल्यामुळे अख्ख्या गावाला त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची उत्सुकता लागली होती. आबालवृद्ध, तरुण- तरुणी फॅशनेबल कपडे परिधान करून स्वागतासाठी सज्ज झाले होते. ज्या हिरोला पाहण्यासाठी ही सारी तयारी सुरू होती. त्या हिरोलाही हे माहीत होते आणि कोरोना परिस्थितीत ते योग्य नाही. याची जाणीव झाल्याने त्या हिरोनेच गर्दी टाळण्यासाठी त्यांचा कार्यक्रम रद्द केला. त्यामुळे जयनगरवासीयांचा हिरमोड झाला. हा प्रसंग आहे, मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा जयनगर गावाला भेटीचा. 
झाले असे की, जयनगर (ता. शहादा) येथे गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली होती. पिण्याच्या पाण्याबरोबर शेती सिंचनासाठी देखील विहीर कूपनलिका आटल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास यामुळे हिसकावला गेला. गावकऱ्यांसमोर पाण्याचे संकट उभे ठाकले. यासाठी श्रमदानाची तयारी करून गावकऱ्यांनी कंबर कसली, त्याला नाम फाउंडेशनची जोड मिळाली. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत पोकलॅड मशीन उपलब्ध झाल्याने जयनगरसह परिसरातील ठिकठिकाणी असलेल्या बंधाऱ्यातील गाळ काढून व नवीन माती बंधारे तयार करून समतोल चाऱ्या तयार करण्यात आल्या. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पर्जन्य झाल्याने जलसंधारणाच्या केलेल्या कामात मुबलक जलसाठा तयार झाला. या कामासाठी नाम फाउंडेशनचे मोठे योगदान असल्याने या फाऊंडेशनचे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावून पाणी टंचाईग्रस्त गावांना नाम फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत केली.

लोकार्पणही मोजक्‍याच लोकात
नाम फाउंडेशनला यंदाचा पुरुषोत्तम पुरस्कार मिळाल्याने तो स्वीकारण्यासाठी चित्रपट अभिनेता मकरंद अनासपुरे हे शहादा येथे आले होते. त्यानिमित्ताने जयनगर येथील नाम फाउंडेशनच्या माध्यमातून झालेल्या विविध जलसंधारण कामांच्या पाहणी व लोकार्पण सोहळा देखील त्यांचा उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. त्यानुषंगाने नाम समिती व ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. गावात प्रत्यक्ष हिरो येत असल्यामुळे ग्रामस्थांना अत्यानंद झाला होता. 

आतुरता होती पण झाला हिरमोड
जयनगरसह परिसरातील आबालवृद्ध अभिनेत्याला पाहण्यासाठी सर्वच आतुरतेने वाट पाहत होते. मात्र कोरोनाची धास्ती सर्वांनाच असल्यामुळे अभिनेत्याला कोरोना नियमाचे उल्लंघन तर होणार नाही ना, याची धास्ती लागली अन् अनासपुरे यांनी एनवेळेस कार्यक्रमाला येणे टाळले. लोकार्पण सोहळ्यासाठी येणारा अभिनेत्याचा कार्यक्रम रद्द झाल्याचा संदेश ग्रामस्थांना प्राप्त झाल्याने सर्वांचा हिरमोड झाला. नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणाहूनच अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी त्या कामाचे प्रतिमा व ग्रामस्थांचा सत्कार स्वीकारून उपस्थित मोजक्याच लोकांशी संवाद साधत कोरोना संपल्यावर निश्चितच गावाला भेट देऊ, असे आश्वासन देऊन मकरंद अनासपुरे परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र गावात अभिनेता येणार असल्याने गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद कोरोनाने हिरावल्याची चर्चा परिसरात होत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे