शाळा सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 31 May 2020


दृष्टिक्षेपात... 
शाळेत एक विलगीकरण कक्ष असावा. 
विद्यार्थ्यांच्या रोजच्या तापमानाची नोंद ठेवावी. 
शाळेत विद्यार्थ्यांचे नियमित वैद्यकीय परीक्षण व्हावे. 
शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही स्वच्छतेचे प्रशिक्षण द्यावे. 

 

शनिमांडळ (नंदुरबार) : लॉकडाउननंतर जेव्हा शाळा, महाविद्यालये उघडतील, तेव्हा वर्गात दोन विद्यार्थ्यांमध्ये पाच फुटांचे अंतर ठेवावे लागणार आहे. इतकेच नव्हे, तर वसतिगृहे, खाणावळी आणि वाचनालयांसाठीही नवी नियमावली तयार करावी लागेल, अशी सूचना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केली आहे. या मार्गदर्शक सूचनांमध्ये विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांसाठीही विशेष सूचना करण्यात आल्या आहेत. याबाबत ‘नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्ड फॉर एज्युकेशन अॅण्ड ट्रेनिंग’ (एनएबीईटी) आणि ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’ने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. 

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नेमलेल्या समितीने विद्यापीठ अनुदान आयोगाने ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे जाहीर केले आहे. बहुतांश शाळा ऑनलाइन भरविण्याच्या सूचना केंद्रीय मंत्रालयाने केल्या आहेत. यात शाळांमध्ये विलगीकरण कक्ष आवश्‍यक राहील. 

वाहतूक व्यवस्था... 
शक्यतोवर विद्यार्थ्यांना स्वतःच्या वाहनाने येणे सूचित करावे. विद्यार्थी आणि शिक्षक निरोगी असतील तेव्हाच शाळेत प्रवेश द्यावा. बसमध्ये सॅनिटायझर ठेवावे, तसेच बसमध्ये प्रवेश करताना मास्कची सक्ती करावी. बसमध्ये दोन विद्यार्थ्यांमध्ये दीड मीटरचे अंतर असावे. 

शाळा प्रवेश... 
मुख्य प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनर असावे. हँड सॅनिटायझर बसवावे. शाळेत प्रवेशापूर्वी गणवेश, पादत्राणांचे सॅनिटायझेशन व्हावे, प्रवेशद्वाराजवळ विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये. शाळेचे व्हरंडे, वर्गखोल्या, कॅफेटेरिया दर चार तासांनी स्वच्छ करावेत. त्या पाण्यात एक टक्का सोडिअम हायपोक्लोराइट असावे. 

शाळांतील इतर उपक्रम 
शाळांमध्ये वीसपेक्षा अधिक विद्यार्थी एकत्र येतील, अशा कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करू नये. शिकवण्यासाठी रिमोट लर्निंग, ऑनलाइन लर्निंग आणि बेल्डेड लर्निंग या पर्यायांचा जास्तीत जास्त वापर करावा. शाळेतील मध्यान्ह भोजन सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत विविध गटांमध्ये विद्यार्थ्यांची विभागणी गरावी. स्वयंपाकघरातील कर्मचाऱ्यांनी सर्व सुरक्षा उपायांचे पालन करणे आवश्यक आहे. 

स्वच्छतागृह... 
स्वच्छतागृहात गर्दी होणार नाही, असे नियोजन करावे. स्वच्छतागृहात सतत पाणी वाहते असावे. साबण, हॅण्डवॉशचा मुबलक पुरवठा करावा. 

असे भरावेत वर्ग... 
आवश्यकता नसेल त्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलवू नये. जास्तीत जास्त वर्ग ऑनलाइन भरवावेत. शिक्षकांनी सॅनिटायझरचा वापर करून प्रवेश करावा. मास्क आणि हातमोजे वापरावेत. संवाद साधताना, विद्यार्थी बसवताना दीड मीटर अंतर असावे. वर्गातील विद्यार्थ्यांची गटात विभागणी करावी. वर्गाच्या सर्व खिडक्या खुल्या ठेवाव्यात. वह्या- पुस्तकांना कमीत कमी स्पर्श करावा. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा. दर दोन तासांनी हात धुण्यासाठी घंटा वाजवावी. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Announcement of guidelines for starting schools