मिरचीचा असा बसला ठसका, की बाजार समिती दोन दिवस बंद

धनराज माळी
Thursday, 10 December 2020

नंदुरबार हे मिरचीचे आगार मानले जाते. परंतु ढगाळ वातावरणामुळे मिरची खरेदी- विक्री करणे म्हणजे खूपच जोखमीचे मानले जाते. कारण घेतलेली मिरची ही ओली असते. ती वाळवावी लागते. मात्र ढगा वातावरणात ती पसरविली व पाऊस झाल्यास तिचे नुकसान होऊ शकते.

नंदुरबार : गुरूवारी सकाळपासून दिवसभर ढगाळ वातावरण होते. हवामान खात्यानेही दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविल्याने मिरची उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. काल तोडणी केलेली मिरची शेतकऱ्यांनी आज बाजार समितीत विक्रीसाठी आणली होती. मात्र व्यापाऱ्यांकडून पावसाळी वातावरणामुळे ती खरेदीस नकार दिला गेला. दुपारपर्यंत मिरचीचा लिलाव रखडला होता. मात्र बाजार समिती प्रशासनाने मध्यस्थी करत दुपारनंतर मिरचीचा लिलाव करून शेतकऱ्यांना दिलासा दिला गेला. मात्र पुढील दोन दिवस मिरची व कापूस विक्रीस न आणण्याचे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे. 

नंदुरबार हे मिरचीचे आगार मानले जाते. परंतु ढगाळ वातावरणामुळे मिरची खरेदी- विक्री करणे म्हणजे खूपच जोखमीचे मानले जाते. कारण घेतलेली मिरची ही ओली असते. ती वाळवावी लागते. मात्र ढगा वातावरणात ती पसरविली व पाऊस झाल्यास तिचे नुकसान होऊ शकते. किंवा ती गोडावनमध्ये साठविताही येत नाही. कारण ओलीमुळे तिला बुरशी लागते व ती काळीही पडते. तीच जोखीम शेतकऱ्यांनाही असते. मिरची तोडल्यानंतर तत्काळ विक्रीस आणली जाते. कालपर्यंत मोकळे वातावरण होते. उन्हाची तीव्रता होती. त्यातच मिरचीचे उत्पादन निघण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी ती तोडली व रात्रीच काहींनी पहाटे वाहने भरून बाजार समितीत आणली. मात्र गुरूवारी सूर्यदर्शन झाले नाही. सर्वत्र ढगाळ वातावरण होते. त्यातच हवामान खात्यानेही दोन दिवस असे वातावरण राहण्याची व पावसाची शक्यता वर्तविली.

अचानक निर्णय अन्‌ दुपारी तोडगा
शेतकऱ्यांनी मिरची विक्रीसाठी आणली. मात्र खरेदीदार व्यापारी मिरची खरेदीस तयार नाही. दररोज दहाला सुरू होणारा लिलाव मिरची बाजारात एक व्यापारीही फिरकला नाही. कारण पाऊस झाल्यास ती ठेवणार कुठे? असा प्रश्न व्यापाऱ्यांपुढे उभा ठाकला. मिरची विकली गेली नाही, तर शेतकरीही ती मिरची परत घेऊन जाऊन ठेवणार कुठे? असा प्रश्न पडला. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले होते. यावर बाजार समितीचे सचिव व पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन समज काढली. केवळ आज आलेली मिरची खरेदी करण्याची विनंती केली. त्यानंतर दुपारी एकला मिरचीचा लिलाव झाला. त्यावेळी शेतकऱ्यांचा जिवात जीव आला. 

 
मीरची, कापूस खरेदी बंद 
दरम्यान, हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजामुळे दोन दिवस जार समितीत मिरची व पळाशी येथील राजीव सूतगिरणीत कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणू नये, असे आवाहन बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी केले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar bajar samiti no sell red chilly in farmer