esakal | सहा महिन्याचा करमाफ न केल्यास नंदुरबारमध्ये भाजप आंदोलन करणार
sakal

बोलून बातमी शोधा

सहा महिन्याचा करमाफ न केल्यास नंदुरबारमध्ये भाजप आंदोलन करणार

शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या भूमिगत गटारींची अवस्था गंभीर आहे. पाणी रस्त्यावर वाहू लागले आहे. रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

सहा महिन्याचा करमाफ न केल्यास नंदुरबारमध्ये भाजप आंदोलन करणार

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार ः श्रेयवादात न पडता महिनाभरात सामंजस्याने सहा महिन्यांचा करमाफ न केल्यास भाजपतर्फे आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजपचे नेते डॉ. रवींद्र चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

डॉ. चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दोन दिवसांपूर्वी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील मुद्दे खोडून काढले. ते म्हणाले, की महिला नगराध्यक्षांनी भाजपच्या नगरसेवकांना फलक न काढल्यास कारवाई करण्याची धमकी दिली आहे. तसेच श्री. रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत आरोप केले. त्यांचा याबाबत बोलण्याचा काय अधिकार? पत्नीचा कारभार ते चालवीत आहेत. यावरून हे सिद्ध होते. त्यामुळे तेही अपात्र ठरू शकतात. मात्र, आम्हाला तसे करायचे नाही. सहा महिने करमाफीचा ठराव झाला नसल्याचे घूमजाव करीत जनतेकडून महामारीत पैसे ओरबाडण्याचे काम सुरू केले आहे. 

डॉ. चौधरी म्हणाले, की लोकहिताचा प्रश्‍न आहे. दहा टक्के कर सूट करू शकतात. पालिकेच्या मालमत्ता कराराने दिली आहे. करारात कर व वीजबिल संबंधिताने भरण्याचे नमूद असताना, त्यांना करमाफ करू शकतात. मग गोरगरीब जनतेचाही सहा महिन्यांचा करमाफ केला पाहिजे. हा श्रेयवादाचा विषय बनवू नये, सामंजस्याने सत्ताधाऱ्यांनी विचार करावा. अकृषक जमिनीचे ठराव त्यांच्या कुटुंबातीलच आहेत. ३५ लाखांचे रस्ते केवळ स्वतःच्या लेआउटमधीलच आहेत. 

भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी म्हणाले, की शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या भूमिगत गटारींची अवस्था गंभीर आहे. पाणी रस्त्यावर वाहू लागले आहे. रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कोरोना महामारीत ही दुसरी महामारी निर्माण केली जात आहे. चारुदत्त कळवणकर, मनोज चौधरी, आनंद माळी, लक्ष्मण माळी, वसईकर, गौरव चौधरी, नरेंद्र माळी आदी उपस्थित होते. 


व्हिडिओ क्लिप बनावट : डॉ. चौधरी 
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दोन दिवसांपूर्वी दाखविलेली सभेची व्हिडिओ क्लिप बनावट असल्याचा दावा डॉ. रवींद्र चौधरी यांनी केला. सभेचे तांत्रिक अडचणीमुळे रेकॉर्डिंग होऊ न शकल्याचे मुख्याधिकाऱ्यांचे पत्र आहे, तर हे रेकॉर्डिंग आले कुठून, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला
 

संपादन- भूषण श्रीखंडे