वर्षभरापूर्वी कोटी रुपयाचा खर्च...अन्‌ आमलाडच्या पुलाचा भराव पुन्हा खचला! 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

दुचाकी वाहनेही जायबंदी होत आहेत. त्यामुळे या पुलाच्या बांधकामाच्या दर्जा विषयीही प्रश्न उपस्थित होत आहे. तेव्हा संबंधित विभागाने पुलाचा खचलेला भराव व पूलाच्या पृष्ठभाग ही दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. 

आमलाड: बऱ्हाणपूर -अंकलेश्वर राज्य महामार्गावर आमलाड येथील पुलाच्या भराव खचल्याने अपघात प्रवण क्षेत्र तयार झाले आहे. भराव दीड ते दोन फूट खचल्याने वाहनचालकांना वाहने काढतांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे खड्डा भरण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे हा पूल वर्षभरापूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 

नंदुरबार आमलाड (ता. तळोदा) गावालगत अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य महामार्गावर असलेला पूल जीर्ण झाल्याने नवीन पूल मंजूर होऊन एक कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पुलाचे बांधकाम करण्यात आले. मागील वर्षी जुलै महिन्यात वाहतुकीसाठी पूल खुला करण्यात आला. पुलाच्या दोन्ही बाजूचे भराव खचले आहेत. पूर्व बाजूला भराव दीड ते दोन फूट खचून खड्डा तयार झाला आहे. या मार्गावरून दररोज हजारो वाहने ये जा करीत असतात. यात दुचाकी, चारचाकी, व अवजड वाहने यांच्या समावेश होतो. त्यामुळे वाहनचालकांना आपले वाहन मोठ्या कसरतीने काढावे लागतात. 

वाहन काढतांना बॅलन्स जाऊन दुचाकीसह त्यावर स्वार पडण्याचा घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. गाडीचे पार्ट तुटणे, चाके बसने, निखळणे असे प्रकार घडत आहेत. आता पावसाळ्यात हे खड्डे पाण्याने भरून त्यांच्या आकार खोली वाढू शकते व वाहन चालवताना अंदाज न आल्याने मोठे अपघात होऊन वित्त व प्रसंगी प्राणहानी होऊ शकते यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

दुचाकीधारक अपघातग्रस्त 
हा पुलाच्या पृष्ठभागाची खूपच दुरवस्था झाली आहे. पृष्ठभागावरचा वरचा थर ठिकठिकाणी उखळला आहे. त्यामधील लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत, त्याच्यामध्ये दुचाकी वाहनेही जायबंदी होत आहेत. त्यामुळे या पुलाच्या बांधकामाच्या दर्जा विषयीही प्रश्न उपस्थित होत आहे. तेव्हा संबंधित विभागाने पुलाचा खचलेला भराव व पूलाच्या पृष्ठभाग ही दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Of the bridge The filler cost again west of ! coredo rupise