धक्‍कादायक..गरोदर मातेचा असह्य वेदनांनी मृत्‍यू, बाळही दगावले; रूग्‍णवाहिका चालक बाजारात व्यस्‍त

दिनेश पवार
Saturday, 3 October 2020

महिलेच्या नातेवाइकांनी दोघांना लवकर येण्यासाठी विनंती केली. कर्मचाऱ्यांनी संबंधित महिलेच्या नातेवाइकांना घटनास्थळी पोहोचण्यास एक ते दोन तास लागतील, असे सांगितले.

मंदाणे (नंदुरबार) : गरोदरमातेच्या उपचारासाठी वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने मातेसह गर्भातील बाळाचा मृत्यू झाला. या घटनेत बेजबाबदारपणे वागलेले १०८ रुग्णवाहिकेवरील चालक व वैद्यकीय अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाईची मागणी आमदार राजेश पाडवी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 
लक्कटकोट (ता. शहादा) येथील प्रमिलाबाई युवराज वसावे या गरोदरमातेला शुक्रवारी (ता. २) सकाळी त्रास जाणवू लागला. तिच्या नातेवाइकांनी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. त्यानुसार रुग्णवाहिका (एमएच १४, सीएल १०५८) वरील चालक राजू वाडीले व वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास पाटील यांच्याशी गरोदरमातेच्या नातेवाइकांचा संपर्क झाला. माहिती दिल्यानंतर संबंधित महिलेच्या नातेवाइकांनी दोघांना लवकर येण्यासाठी विनंती केली. कर्मचाऱ्यांनी संबंधित महिलेच्या नातेवाइकांना घटनास्थळी पोहोचण्यास एक ते दोन तास लागतील, असे सांगितले. त्यामुळे संबंधित महिलेच्या नातेवाइकांनी आमदार राजेश पाडवी व त्यांचे स्वीय साहाय्यक हेमराज पवार यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. 

चालक बाजारात तर डॉक्‍टर बाथरूममध्‍ये
तत्काळ स्वीय साहाय्यक पवार यांनी १०८ रुग्णवाहिकेवरील चालक व वैद्यकीय अधिकाऱ्याची माहिती मिळवली. चालक राजू वाडीले बाजारात खरेदी करताना व वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास पाटील घरी आंघोळीत व्यस्त असल्याची माहिती मिळाली. 

वाटेतच प्रसूती 
गरोदर महिलेला जास्त त्रास होऊ लागल्याने तिला खासगी वाहनाने लक्कटकोट येथून म्हसावद ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेऊ लागले. उपचारासाठी नेत असतानाच संबंधित महिला रिक्षातच प्रसूती झाली. त्यात महिलेने एका नवजात बाळाला जन्म दिला. पुढे म्हसावद ग्रामीण रुग्णालयात गरोदरमातेला नेले. मात्र, वेळेवर न पोचू न शकल्याने संबंधित माता व तिच्या गर्भात असलेल्या दुसऱ्या बाळाचा मृत्यू झाला. 

जिल्‍हाधिकारी यांच्याकडे तक्रार
सदर घटनेप्रकरणी जबाबदार असलेले १०८ रुग्णवाहिकेवरील संबंधित बेजबाबदार चालक व वैद्यकीय अधिकारी यांची चौकशी होऊन गरोदर महिला व बाळाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या चालक व वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार पाडवी यांनी लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar call ambulance but no spot avalable and death pregnant mother