विना परवानगी मुंबईला गेले...अन्‌ सर्वांना पडले महागात ! 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 June 2020

शहरात अत्यावश्यक बाबींसाठीच संचारबंदीत शिथीलता देण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर अनावश्यक फिरू नये. परवानगी न घेता प्रवास करून नये.

नंदुरबार  : जिल्ह्यातील संचारबंदी आदेश आणि साथ रोग प्रतिबंधक कायदा व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याबद्दल राजीव गांधी नगर नंदुरबार येथील तीन व्यक्तींविरोधात नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.बाबूराव बिक्कड यांनी यांनी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. 

या तीन व्यक्तींनी ३० जून २०२० पर्यंत मनाई आदेश लागू असताना सदर आदेशाचा भंग करीत शासनाची परवानगी न घेता मुंबई येथे प्रवास केला व पुन्हा नंदुरबार येथे आले. या दरम्यान त्यांनी कोरोना संक्रमणाची वैद्यकीय चाचणीदेखील न केल्याने इतरांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना विषाणू विषयी कल्पना असताना व इतरांना आपल्यामुळे धोका होऊ शकतो हे माहित असतानादेखील त्यांनी 
विनापरवानगी प्रवास केला व स्वत:सोबत घरातील इतरांनादेखील संक्रमीत केल्याने श्री.भिक्कड यांनी भारतीय दंड संहितेचे कलम १८८, २६८, २६९, २९०, ३४ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५४ आणि साथीचे रोग अधिनियम १८९७ चे कलम ३ नुसार हा गुन्हा दाखल केला आहे.

 

शहरात अत्यावश्यक बाबींसाठीच संचारबंदीत शिथीलता देण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर अनावश्यक फिरू नये. परवानगी न घेता प्रवास करून नये. बाहेर फिरताना चेहऱ्यावर मास्क घालावा आणि शारिरीक अंतराचे पालन करावे. नियमांचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी वसुमना पंत यांनी कळविले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Charges filed against three persons for going to Mumbai without permission