आचारी निघाला पॉझिटिव्ह...अन्‌ फार्महाऊसवरील जेवणावळीने अनेकांना लागला आता घोर! 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

अधिकारी, अनेक नगरसेवक आणि राजकीय पुढारी मिळून जवळपास तीनशे लोक उपस्थित राहिले मात्र ते पाच सहाच्या गटाने येऊन गेले.

नंदुरबार  : कोरोना प्रसार होऊ नये, म्हणून शासनाने सामूहिक कार्यक्रमांना बंदी घातलेली असतानासुद्धा येथील एका नेत्याच्या मुलाच्या लग्नाप्रीत्यर्थ एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर जेवणावळ देण्यात आली, परंतु जेवणाची व्यवस्था बघणारा खानसामाच पॉझिटिव्ह निघाल्याची चर्चा आज दिवसभर शहरात पसरल्याने उपस्थित सर्व बड्या मंडळींचे आणि अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 

शहरातील या नेत्याने मुलांच्या लग्नाची जेवणावळ नुकतीच एका फार्म हाऊसवर दिली. यात खास विश्वासू आणि अनेक अधिकारी सहभागी झाल्याचे सांगण्यात येते. अधिकारी, अनेक नगरसेवक आणि राजकीय पुढारी मिळून जवळपास तीनशे लोक उपस्थित राहिले मात्र ते पाच सहाच्या गटाने येऊन गेले अशीची चर्चा आहे. जेवणावळ अर्थातच मांसाहारी होती. त्यासाठी खास असलेला एक खानसामानेच फार्महाउसवरील जेवण तयार केले. त्याच्या हातच्या जेवणाची चव चाखून मिटक्या मारत घरी परतलेल्या त्या सर्व बड्या मंडळींची मात्र आता झोप उडाली आहे. त्याचे कारणही तसेच सांगितले जात आहे, ते म्हणजे हा खानसामाच पॉझिटिव्ह निघाल्याची चर्चा आहे.

याबाबत अधिकृत खुलासा झालेला नसला तरी जेवणावळीला आलेल्यांना मात्र आता घोर लागून राहिला आहे. संपूर्ण शहरात दबक्या आवाजात आज ही चर्चा रंगलेली दिसून आली. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर खासगीत अनेकांनी या पार्टीबद्दल दुजोरा दिला. दरम्यान आता जिल्हा आणि आरोग्य प्रशासन या चर्चेची काय दखल घेते याकडे शहरवासियांच्या जिवाला घोर लागून आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar The chef went corona positive and Many felt horrified