नंदुरबारची मिरची भारी...पण तिचा ठसका पडतोय फिका

कमलेश पटेल
Monday, 17 August 2020

नंदुरबार हा प्रमुख मिरची उत्पादक जिल्हा असून मिरचीचे आगार म्हणून ओळखला जातो. अनेक वर्षापासून मिरचीला मिळणारा कमी भाव आणि पिकावर पडणाऱ्या विषाणूजन्य रोग आदी संकटे असतानाही जिल्ह्यात ३ हजार ३६५ हेक्टरवर शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली आहे.

शहादा : जिल्ह्यात लागवड केलेल्या मिरची पिकावर वाढत्या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भावामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. त्या मानाने बाजारात हिरव्या मिरचीला अपेक्षित दर मिळत नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे. कोरोनाचा फटका उत्पादीत मालाला बसत असल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारणही बिघडत आहे. 

नंदुरबार हा प्रमुख मिरची उत्पादक जिल्हा असून मिरचीचे आगार म्हणून ओळखला जातो. अनेक वर्षापासून मिरचीला मिळणारा कमी भाव आणि पिकावर पडणाऱ्या विषाणूजन्य रोग आदी संकटे असतानाही जिल्ह्यात ३ हजार ३६५ हेक्टरवर शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली आहे. यंदा मात्र हिरव्या मिरचीला योग्य दर मिळत नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. काही शेतकरी हिरवी मिरची तोडून विक्रीस प्राधान्य देतात तर काही झाडावरच लाल झाल्यावर तोडणी करतात. हिरवी मिरची हॉटेल व्यवसायात मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. परंतु यंदा कोरोनामुळे हॉटेल व्यवसायही बंद आहे. परिणामी मिरचीला फारसा बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. 

व्हायरस फ्री वाण? 
संशोधनानुसार मिरचीचे अनेकविध वाणांची रोपे दरवर्षी बाजारात येतात. सातत्याने विषाणुजन्य रोगांचा होणारा प्रादुर्भाव लक्षात घेता. कंपन्यांनी व्हायरस फ्री असल्याचा दावा करणाऱ्या वाणाची निवड शेतकऱ्यांनी केली. मिरचीच्या रोपवाटिकेतून दीड ते दोन रुपये प्रति रोप प्रमाणे रोपे खरेदी केलीत. मात्र तरीही यावर्षी मिरची वर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याने फवारणी व इतर खर्चामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला असल्याचे मिरची उत्पादक शेतकरी सांगतात. त्यामानाने अपेक्षित दर मिळत नाही. 

शेतातून पिक उपटून फेकले 
दरम्यान एक ते दीड रुपये दराने नर्सरीतून मिरचीचे रोप खरेदी केले. एकरी सहा ते साडेसहा हजार रोपांची लागवड केली जाते. साधारणता एकरी ५० हजार रुपयापर्यंत खर्च येतो. यंदा मात्र मिरची पिकावर विषाणूजन्य आजाराचा फैलाव झाल्याने शेतकऱ्यांनी उपाययोजना करूनही पिकाची स्थिती सुधारत नसल्याने नाविलाजास्तव लागवड केलेले पिक शेतातून उपटून बाहेर फेकले. 
 
यंदा दोन एकर क्षेत्रात व्हीएनआर जातीच्या मिरचीची लागवड केली आहे. परंतु सध्या मिरचीवर लिपकर्ल विषाणूमुळे पिकाची पाने आखडणे, वाढ खुंटने आदी प्रकार घडत आहेत. त्यामुळे मिरचीचे झाड उपटून फेकावे लागत आहे. 
-मच्छिंद्र पाटील, मिरची उत्पादक, डोंगरगाव, ता. शहादा 

जिल्ह्यात लागवडीखालील मिरचीचे क्षेत्र (हेक्टर मध्ये) 
नंदुरबार-- २२४३.५० 
नवापूर -- ३५ 
शहादा-- ९२५ 
तळोदा-- ७७ 
अक्रानी-- १० 
अक्‍ककुवा-- ७५ 
एकूण ३३६५.५० 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Chili production depo but no rate market farmer