esakal | मुख्यमंत्री ठाकरे 15 ला नंदुरबार दौऱ्यावर; जलतरण तलावाचे होणार उद्‌घाटन
sakal

बोलून बातमी शोधा

uddhav thakre

मुख्यमंत्री ठाकरे 15 ला नंदुरबार दौऱ्यावर; जलतरण तलावाचे होणार उद्‌घाटन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : ऑलंपीकच्या धर्तीवर बांधण्यात आलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे काम पूर्ण झाले असून त्याचे उद्‌घाटन १५ फेब्रुवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर जी. टी. पाटील महाविद्यलयाच्या प्रांगणात नागरी सत्कार व जाहीर सभा होईल, अशी माहिती शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात माहिती देण्यासाठी श्री. रघुवंशी यांनी आज पत्रकार परिषद आयोजीत केली होती. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे उपस्थित होते. यावेळी श्री. रघुवंशी म्हणाले, ऑलंपिकच्या धर्तीवर नंदुरबार शहरात जलतरण तलाव साकारावा ही इच्छा होती. ती पूर्ण होत आहे. जिल्ह्यातील क्रीडापटूंसाठी सज्ज झाले आहे. १५ फेब्रुवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे. सकाळी दहाला जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या प्रांगणात हेलीपॅडवर उतरतील. त्यानंतर थेट स्वर्गीय बटेसिंह रघुवंशी उद्यानातून जलतरण तलावाच्या ठिकाणी पोहोचतील. त्या ठिकाणी उद्‌घाटन झाल्यानंतर थेट आमदार कार्यालयाजवळून जुने न्यायालयाच्या इमारतीत साकारणाऱ्या पालिकेच्या प्रशासकिय इमारतीचा भूमिपूजन करतील. तेथून जी. टी. पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात नागरी सत्कार व जाहीर सभा होणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत, मंत्री दादा भूसे, धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, नंदुरबारचे पालकमंत्री के. सी. पाडवी, खासदार डॉ. हीना गावित, माजीमंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित, जिल्हापरिषद अध्यक्षा सीमा वळवी, शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात, आमदार राजेश पाडवी, जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष राम रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत आदी उपस्थित राहणार आहेत. जाहीर सभेनंतर मुख्यमंत्री श्री. ठाकरे पुढील कार्यक्रमासाठी जळगावकडे रवाना होणार आहेत, अशी माहिती श्री. रघुवंशी यांनी दिली. 

निविदेची वाढूनही पालिकेने केला तलाव पूर्ण 
यावेळी बोलतांना श्री. रघुवंशी म्हणाले की, २००९ मध्ये क्रीडा धोरणानुसार एक कोटी २० लाख रुपये शासनाने जलतरण तलावासाठी मंजूर केले होते. त्यात ९० लाख शासन व ३० लाख रुपये पालिका असा हिस्सा होता. २०१३ मध्ये या प्रकल्पाची किंमत वाढत्या महागाईमुळे वाढली. त्यावेळेस क्रीडामंत्रीपद जिल्ह्याकडे होते. त्यामुळे हा प्रकल्प मंजूर करुन घेण्यात आला. २०१६ मध्ये शासनाने प्रकल्पाचे कामाचे आदेश दिले. त्यावेळेस दोन कोटी २० लाख रुपये खर्च लागणार होता. त्याची आजची किंमत तीन कोटीवर गेली आहे. प्रकल्पाचे काम रेंगाळले तरीही पालिकेने ते काम पूर्णच केले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने तो साकारायचा होता. ते स्वप्न पूर्ण झाले. योगायोगाने बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. आणि त्यांच्या हस्ते जलतरण तलावाचे उद्‌घाटन होत असल्याने प्रकल्पाची स्वप्नपूर्ती व समाधान मिळाले आहे.