रोजगार हमी योजनेचा दोन दिवसांत आराखडा तयार करा 

धनराज माळी
Thursday, 10 December 2020

या वर्षी १२० कोटींची कामे करण्याचे उद्दिष्ट ठेवून त्यासाठी आवश्यक नियोजन करावे. कृषी विभागाने फळबाग लागवडीवर भर द्यावा.

नंदुरबार : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०२१-२२ साठी ग्रामपंचायतींनी दोन दिवसांत आराखडा अंतिम करावा आणि २०२०-२१ चा पुरवणी आराखडा सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले. 

आवश्य वाचा- शिवभोजन योजना ठरली संजीवनी; साडेतीन लाखांपेक्षा जास्त थाळ्यांनी गरजू तृप्त !

जिल्हाधिकारी कार्यालयात मनरेगा अंतर्गत झाालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अश्‍विनी भारुड, जिल्हा वनसंरक्षक सुरेश केवटे आदी उपस्थित होते. 

डॉ. भारुड म्हणाले, की गतवर्षी झालेल्या ६७ कोटी खर्चाच्या तुलनेत या वर्षी आतापर्यंत चांगले काम झाले आहे. या वर्षी १२० कोटींची कामे करण्याचे उद्दिष्ट ठेवून त्यासाठी आवश्यक नियोजन करावे. कृषी विभागाने फळबाग लागवडीवर भर द्यावा. त्यामुळे स्थलांतर कमी होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहित करावे. प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करण्यात यावीत. धडगाव तालुक्यात रस्त्यांची कामे घेण्यात यावीत. तोरणमाळसारख्या ठिकाणी ग्रामस्थांच्या सहकार्याने वन विभागाने स्थानिकांना रोजगार देणारे उपक्रम सुरू करावेत. वनक्षेत्र वाढविण्यासाठी रोपवाटिकांची निर्मिती आणि वृक्षलागवडीवर भर द्यावा. अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मनरेगाअंतर्गत अधिक कामे सुरू करावीत, असे आवाहन त्यांनी केले. 

आवश्य वाचा- दररोज दर्शन देणारा बिबट्या अखेर अडकला; पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी 

श्री. गावडे म्हणाले, की गटविकास अधिकाऱ्यांनी घरकुलाच्या कामांवर विशेष लक्ष केंद्रित करावे. कामांचे जिओ टॅगिंग करावे. इतर यंत्रणांनीही कामांना गती द्यावी आणि तांत्रिक त्रुटी दूर कराव्यात. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत या वर्षी ३०.१४ लक्ष मनुष्य दिवसाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, २३.७४ लक्ष पूर्ण झाले आहे. ११९ कोटी ६५ लक्ष रुपयांपैकी ६४ लक्ष पूर्ण झाले आहेत. सद्यःस्थितीत एक हजार ६७६ कामे सुरू असून, सात हजार ९१७ मजुरांची उपस्थिती आहे, अशी माहिती श्री. मोरे यांनी या वेळी दिली.  

 
संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar collectors instructions for preparation of employment guarantee scheme