कोरोना दक्षतेचे नियम पाळत नंदुरबारमध्ये बारावीच्या पुर्नपरिक्षांना प्रारंभ 

धनराज माळी
Friday, 20 November 2020

कोरोना महामारी अद्याप संपलेली नाही. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करून मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आदेश दिले होते.

नंदुरबार ः कोरोनाबाबत दक्षतेचे नियम पाळत बारावीच्या पुर्नपरिक्षांना आजपासून जिल्ह्यात चार केंद्रावर शांततेत प्रारंभ झाले. यावेळी परीक्षा केंद्र परिसरातील २०० मीटर अंतरापर्यंत पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आले होते. पहिल्या दिवशी परीक्षा हॉल सॅनिटायजरसह परीक्षार्थींना मुख्य प्रवेशद्वारावर हाताला सॅनिटायझर लावण्यास देण्यात आले. तसेच परीक्षा हॉलमध्येही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. 

 वाचा- आदिवासी विभागाच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू होणार 

सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत काही विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुर्नपरिक्षेस आजपासून सुरुवात झाली आहे. शासनाने परीक्षा घेण्यास परवानगी दिल्यानंतर शिक्षण मंडळ व त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसापूर्वी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्या बैठकीत कोरोना महामारी अद्याप संपलेली नाही. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करून मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आदेश दिले होते.

 

त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक व परीक्षेसाठी नियुक्त पर्यवेक्षक यांची बैठक घेऊन नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शुक्रवारी परीक्षा सुरू होण्यापूर्वी परीक्षा हॉलमध्ये सनिटायझर करण्यात आली. बैठक व्यवस्थेसह वर्गातील भिंती, प्रवेशद्वार, खिडक्या यांना सॅनिटायझर मारून निर्जंतुकीकरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना मुख्य प्रवेश द्वारावर सॅनिटयझर देण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर परीक्षा हॉलमध्ये तीन मीटरपेक्षा जास्त अंतर ठेवून विद्यार्थ्यांना बसविण्यात आले होते. परीक्षा केंद्राबाहेर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Commencement of twelth standard re-examination in nandurbar