'लॉकडाऊन' चा निघाला आदेश... अन बाजारपेठेत ग्राहकांची झुंबड !

धनराज माळी
Wednesday, 22 July 2020

शहरात सकाळी नऊपासून मंगळ बाजार, घी बाजार, सुभाष चौक, अमृत चित्र मंदिर परिसर, स्टेशन रोड, जुनी नगरपालिका भागात ग्राहकांची गर्दीच गर्दी झालेली होती.

नंदुरबार ः कोरोना महामारीचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आज मध्यरात्रीपासून नंदुरबार,नवापूर, शहादा, तळोद्यात ३० जुलैपर्यंत ८ दिवस 'लॉकडाऊन' घोषित केला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आज बुधवारी नंदुरबार शहरातील बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झुंबड उडाली होती. अक्षरशः एकमेकांना बाजारपेठेतून बाहेर पडण्यासाठी मुश्किल झाले होते. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा पूणर्तः फज्जा उडाला होता. 

आज बुधवारी मध्यरात्री १२ पासून ८ दिवस लॉकडाऊन राहणार असल्याने नागरिकांनी आवश्यक त्या वस्तू खरेदी करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. त्यामुळे आठ दिवसात सारेच काही संपेल, कोणाला काहीही मिळणार नाही, आपण राहून जाऊ की काय , असा बेत करीत महिला पुरूषांनी आज बाजारात एकच गदीर् केली होती. भाजीपाला, किराणा खरेदीसाठी अक्षरशः झुंबड उडाली होती. माणसाला माणस ठोकली जात होती. बाजारपेठेत येणाऱ्यांना व बाहेर जाणाऱ्यांना निघणेही मुश्किल झाले होते. एवढी झुंबड आज सायंकाळ पयर्ंत होती. भाजीपाला, अत्यावश्यक वस्तू आदी साहित्य खरेदी करण्यासाठी शहरात सकाळी नऊपासून मंगळ बाजार, घी बाजार, सुभाष चौक, अमृत चित्र मंदिर परिसर, स्टेशन रोड, जुनी नगरपालिका भागात ग्राहकांची गर्दीच गर्दी झालेली होती. मंगळ बाजारातील मोहनसिंग भैया व्यापारी संकुल जवळील चारही रस्त्यांवर अकराच्या सुमारास एवढी गर्दी होती की, एकमेकांना अक्षरशः धक्के मारून नागरिक जात होते. त्यामुळे कसले फिजिकल डिस्टन्सिंग व कसले काय, अनेकांचा तोंडाला मास्क नव्हते, साऱा फज्जा उडाला होता. 

पेट्रोल-डिझेलसाठी रांगा 
पेट्रोल पंपावर केवळ कोरोना संबंधी कामकाज पाहणारे शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच शासकीय वाहनांना पेट्रोल,डिझेल मिळणार असल्याने पेट्रोल ,डिझेल भरूण घेण्यासाठी पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. तशीच स्थिती किरकोळ, होलसेल किराणा दुकानात सुद्धा पाहायला मिळाली. बहुतेक किराणा दुकानांसमोर दुकान मालकांनी सोशल डिस्टंसिंगच्या खुणा करत ग्राहकांना त्या ठिकाणी उभे करून मालाचे वितरण केले. तर काही दुकानांमध्ये फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Consumers Crowd to the market after the lockdown order