शुभमंगलचे स्वर आता पुढच्या वर्षीच! 

यश पाटील
Thursday, 16 April 2020

लग्नसराईआधी दोन महिने मंडप आणि डेकोरेशनमध्ये दरवर्षी बदलत्या काळानुसार मोठ्या प्रमाणात गुंतवणुक करावी लागते. ग्राहकांच्या मागणीनुसार सजावटबदलत जाते. सध्या एप्रिल आणि मे महिन्यात मोठ्या प्रमाणात बुकिंग होती परंतु एप्रिलच्या बुकिग रद्द झाल्या आहेत. भांडवल अडकले आहे. 
-नवनीत पाटील, लक्ष्मी टेन्ट हाऊस,कहाटूळ. 

कहाटूळ : सध्या कोरोनाच्या धोक्यामुळे आता तीन मे पर्यतदुसऱ्यांदा लॉकडाऊन झाल्याने विवासोहळे आता जवळपास रद्द झाल्यात जमा आहेत. यामुळे अनेकांनी आता दिवाळीनंतर पाहू असा निर्णय घेतला आहे, त्यामुळे विवाहाशी संबंधित विविध व्यावसायिकही आर्थिक कचाट्यात सापडले आहेत. 

कोरोनान जसा लग्नसराईचा आनंद हिरावून घेतला आहे. अनेकाच्या तयारीवर पाणी फिरले आहे. वाहतूकच बंद असल्याने ना सोयरिक जुळवण्यास प्राधान्य ना घरगुती तयारीची धावपळ, एरव्ही एप्रिलमध्ये असलेली धामधूम गावात नाही की शहरात. काहींनी रजिस्टर मॅरेजचा पर्यायही शोधला, पण ते फारच कमी.या एकूण स्थितीमुळे संबंधित व्यावसायिकही शांत आहेत. 

विवाहांसाठी मंडप, डेकोरेटर्स, बँड वाजंत्री, फोटोग्राफर, केटर्स, वेटर्स, आचारी, कापड व्यावसायिक, सोने दागिने विक्रेते हे सर्व व्यावसायिकांचा व्यवसाय ठप्प आहे. या चार महिन्याच्या कालावधीत मिळणाऱ्या उत्पन्नातून पुढील आठ महिन्याच्या दैनंदिन गरजा भागवता येतात. परंतु आता सारेच थांबले आहे. 
लग्नसराईच्या काळात ब्युटी पार्लरचालिकांना जेवायला फुरसत नसते. नवरी मुलीची सजावट, मेहंदी,घऱच्यांची सजावट अशा कामांसाठी त्यांच्य तारखा बुक असतात. यंदा भांडवलही निघणार नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar corona marriage next year