नंदुरबार येथील तो कोरोनाग्रस्त भुसावळला आल्याची माहिती 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 April 2020

नंदुरबार येथील कोरोनाग्रस्त शहरातील एका परिवारात आला होता. याशिवाय तो अन्य एका परिवारासमवेत राहिला असून, येथील एका हॉटेलमध्येही त्याने मुक्काम केला असल्याची माहिती त्याच्या मोबाईल लोकेशनवरून नंदुरबार पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे

भुसावळ : नंदुरबार येथील कोरोनाग्रस्त येथे येऊन गेला असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने आज दुपारपासून त्याबाबत खात्री करण्यासाठी अनेक ठिकाणी चौकशी केली आहे. या वृत्तामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

नक्‍की पहा - अमळनेरची महिला "कोरोना पॉझिटिव्ह' 

नंदुरबार येथील कोरोनाग्रस्त शहरातील एका परिवारात आला होता. याशिवाय तो अन्य एका परिवारासमवेत राहिला असून, येथील एका हॉटेलमध्येही त्याने मुक्काम केला असल्याची माहिती त्याच्या मोबाईल लोकेशनवरून नंदुरबार पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे नंदुरबार पोलिसांनी भुसावळ पोलिसांना त्यासंदर्भात चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. या सूचनेमुळे ‘डीवायएसपी‘ गजानन राठोड, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी येथील अनेक ठिकाणी चौकशी केली आहे. मात्र, हा रुग्ण नेमका कधी आला. यासंदर्भात मात्र कोणतीही माहिती मिळत नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यासंदर्भात नंदुरबार व भुसावळ पोलिस प्रशासन चौकशी करीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी दिली. 

रूग्णाच्या संपर्कातील १५ जण ‘क्वारंटाइन’ 
नंदुरबार : शहरात ‘कोरोना’चा पहिला रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे पालिकेसह आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. शुक्रवारी (ता. १७) रात्री साडेनऊ ते साडेबारापर्यंत शहरातील १७ वसाहतींमध्ये तत्काळ सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी करण्यात आली. या सर्व वसाहतींसह त्यांच्या आजूबाजूचा एक किलोमीटरचा परिसर ‘सील’ करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांसह त्याने उपचार घेतलेल्या खासगी रुग्णालयाचे डॉक्टर व तेथील कर्मचाऱ्यांसह १५ जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ‘क्वारंटाइन’ करण्यात आले आहे. 
 
हा परिसर रात्रीच केला ‘सील’ 
‘कोरोना पॉझिटिव्ह’ असल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त होताच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलिस अधिकारी चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील रुग्ण वास्तव्यास असलेल्या वसाहतीसह त्या परिसरातील अलीसाहब मोहल्ला, फकीर मोहल्ला, बालाजीवाडा, दखनी गल्ली, मणियार मोहल्ला, बिस्मिल्ला चौक, बिफ मार्केट रोड, रज्जाक पार्क, अमीनभय्या चाळ, चिंचपाडा भिलाटी, मेहतर वस्ती, गोंधळी गल्ली, जुना बैल बाजार आदींसह १७ ठिकाणी रात्रीत ‘सील’ करण्यात आले. या १७ वसाहतींमध्ये पालिकेच्या आरोग्य विभागाने रात्रीतून सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी केली. 

शहरात नागरिकांनीच केले रस्ते बंद 
महिनाभरापासून शासन सांगून सांगून कंटाळले होते. तरीही नागरिक भाजीपाला खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करीत होते. काही बिनधास्त फिरत होते. मात्र, शुक्रवारी (ता. १७) शहरात ‘कोरोना’चा ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी आपापल्या वसाहतींमधील रस्ते स्वतः बॅरिकेटस अथवा वाहने किंवा काटेरी झडपे टाकून बंद केले, तसेच प्रशासनानेही ‘सील’ केलेल्या वसाहती परिसरात १४ ठिकाणी मुख्य रस्ते बॅरिकेटस लावून बंद केले आहेत. पहाटे पाचपर्यंत काम सुरू होते. 
 
अलीसाहब मोहल्ला ‘कंटेन्मेंट झोन’ 
शहरातील ४८ वर्षीय रुग्ण ‘कोरोना पॉझिटिव्ह’ असल्याचा अहवाल शुक्रवारी रात्री प्राप्त झाला. हा रुग्ण वॉर्ड क्रमांक १० मधील आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून अलीसाहेब मोहल्ला परिसरातील एक किलोमीटर भाग ‘कंटेन्मेंट झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्याच्या एक ते दोन किलोमीटर परिसरात कोणत्याही वाहनास जाण्यास अनुमती नसेल, तसेच कोणतेही व्यवहार सुरू राहणार नाहीत. 
 
‘त्या‘ १५ जणांचा स्वॅब तपासणीला’ 
रुग्णाच्या कुटुंबातील सहा सदस्यांचे ‘स्वॅब’ नमुने घेण्यात आले असून, त्यांना ‘क्वारंटाइन’ करण्यात आले आहे. रुग्णाने ज्या खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते, तेथील एक डॉक्टर आणि इतर पाच कर्मचारी व अन्य तीन जवळचे नातेवाइक, अशा पंधरा व्यक्तींचे ‘स्वॅब’चे नमुने घेऊन त्यांना ‘क्वारंटाइन’ करण्यात आले आहे. 
 
संसर्ग टाळण्यासाठी हे करा 
कोरोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.  नागरिकांनी घराबाहेर पडू नये, स्वत:ची काळजी घ्यावी,. मास्क आवश्‍य वापरा, हात नियमित धुवा, सॅनिटायझरचा वापर आदी उपाययोजनांवर भर द्यावा, खोकला, श्वास घेताना त्रास आणि ताप अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत रुग्णालयात तपासणी करून घ्यावी, नागरिकांनी घाबरू नये व प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे. 
 
सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे : के. सी. पाडवी 
सर्वांना माहिती आहे ‘लॉकडाउन’ होऊन २६ दिवस झाले. जिल्ह्यात एकही रुग्ण नव्हता. जिल्हा ‘ग्रीन झोन’मध्ये होता. तो ‘ग्रीन झोन’मध्ये ठेवण्यासाठी आरोग्य, जिल्हा प्रशासन सक्षम आहे. मात्र, शुक्रवारी (ता. १७) ‘कोरोना’चा ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळून आला. तो मालेगावहून आल्याचे कळते. आतापर्यंत सर्वांनी चांगले काम केले. मात्र, एक रुग्ण आढळल्याने गालबोट लागले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री आदेश काढले आहेत, तीन दिवस बंद राहील. जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे. नंदुरबार जिल्हा कसा सुरक्षित राहील यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ असला तरी आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. तो परत ‘निगेटिव्ह’ होईल. सर्वांनी संयम ठेवावा. परत आपला जिल्हा ‘ग्रीन झोन’मध्ये जाईल, असा विश्‍वास आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांनी व्यक्त केला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar corona positive case person bhusawal contact