बेफिकरी...ज्‍यातून जातोय कोरोना पॉझिटीव्ह त्‍याचीच वाट बिकट

धनराज माळी
Monday, 7 September 2020

जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यात चारपटीने कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढली आहे तर मृतांची संख्या दुप्पट झाली आहे. दररोज शंभरी पार करणारे अहवाल हाती येत आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्ण संख्या चिंता वाढविणारी आहे. असे असले तरी आता आरोग्य प्रशासन असो की सुरक्षा यंत्रणा यांच्यासोबतच नागरिकांनीही कोरोनाचे गांभीर्य घेणे सोडले आहे.

नंदुरबार : शहरातील रूग्णांना ने-आण करणाऱ्या रुग्णवाहिकांमध्ये स्वच्छतेचा मोठ्या प्रमाणावर अभाव असल्याचा अनुभव रूग्णांना येऊ लागला आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्ण अशा रुग्णवाहिकेने रुग्णालयापर्यंत जाण्यासही नकार देत असल्याचे वास्तव आहे. जसजशी कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे, तसतसे आरोग्य प्रशासनही आता सोयी-सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा तक्रारी वाढल्या आहेत. 

जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यात चारपटीने कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढली आहे तर मृतांची संख्या दुप्पट झाली आहे. दररोज शंभरी पार करणारे अहवाल हाती येत आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्ण संख्या चिंता वाढविणारी आहे. असे असले तरी आता आरोग्य प्रशासन असो की सुरक्षा यंत्रणा यांच्यासोबतच नागरिकांनीही कोरोनाचे गांभीर्य घेणे सोडले आहे. त्यामुळे न नागरिकही बिनधास्त व आरोग्य यंत्रणा तर त्यापेक्षाही जास्त बिनधास्त झाल्याचे दिसून येत आहे. 
रुग्णवाहिका या कॉन्ट्रक्ट पद्धतीने सुरू आहेत. त्यामुळे त्यांची जबाबदारी आरोग्य विभागावरच आहे. रूग्णवाहिकांसंदर्भात आरोग्य विभाग अत्यंत गाफिल आहे. रूग्णवाहिकांबाबतच्या तक्रारी या नेहमीच्याच झाल्या आहेत. फोन केल्यावर वेळेवर रूग्णवाहिका न पोहोचणे हा भाग तर नित्याचाच झाला आहे. त्यामुळे रूग्णांचे कुटुंबीय स्वतःच्या वाहनाने किंवा खासगी वाहनाने रूग्ण घेऊन जातात व आणतात. मात्र रुग्णवाहिकेबाबतच्या तक्रारींची फारशी दखल घेतली जात नाही. मागील आठवड्यात शहरातील एका कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाला घेण्यासाठी रुग्णवाहिका गेली होती. त्या रुग्णवाहिकेत संबंधित रूग्ण बसल्यावर तिला दुर्गंधी येऊ लागली. जिल्हा रूग्णालयात पोहोचेपर्यंत त्या महिला रूग्णाने उलटी केली. त्या रूग्णाच्या पालकांनी विचारणा केली असता. रूग्णवाहिकेत अत्यंत दुर्गंधी येत होता. त्यामुळे उलटी झाल्याचे रूग्णाचे म्हणणे होते. संबंधित रूग्णाच्या नातेवाईकाने थेट ‘सकाळ'कडे येऊन रूग्णवाहिकेतील स्वच्छतेच्या अभावाबाबत तक्रार मांडली. 

सॅनिटायझिंग करणे दूरच 
रूग्णवाहिका रूग्ण घेण्यासाठी किंवा सोडण्यासाठी जाते. त्यावेळेस रूग्णवाहिका पुन्हा सॅनिटायझ करणे आवश्यक आहे. मात्र तसे घडत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही चालक ते काम प्रामाणिकपणे स्वतः पार पाडतात. मात्र काही चालक एकदा सकाळी सॅनिटायझ केली कि दिवसभर रूग्ण ने- आण करतात. त्यामुळे संसर्ग वाढण्याची भिती बळावली आहे. प्रत्येक वेळेस रूग्ण सोडल्यानंतर किंवा आणल्यानंतर रूग्णवाहिका सॅनिटायजिंगकेली पाहिजे. मात्र तसे होत नसल्याचे चित्र आहे याकडे आरोग्य प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. अशा प्रकारामुळे रूग्णांमध्ये भिती बळावत आहे. (क्रमश) 
 
कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांना ने-आण करण्यासाठी रूग्णवाहिका पाठविली जाते. तिची स्वच्छता व्यवस्थित केलेली नसते, माझ्या कुटुंबातील रूग्ण 
रूग्णवाहिकेने जिल्हा रूग्णालयात गेला त्यावेळेस अक्षरशः दुर्गंधीने त्यांना उलट्या झाल्या, इतकी गंभीर अवस्था रूग्णवाहिकांची आहे. सॅनिटाझिंग वेळोवेळी केली जात नाही. आरोग्य विभागाचे मात्र याकडे साफ दुर्लक्ष आहे. 
- कुंदन थनवार, सफाई कर्मचारी संघटना, नंदुरबार. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar corona positive case shift hospital ambulance no cleaning