नंदुरबार : संपर्क साखळीमुळे दोन दिवसात २७ कोरोना पॉझिटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 July 2020

गेल्या दोन महिन्यापासून अत्यंत स्लो गतीने आढळणाऱ्या रूग्णांमुळे नंदुरबार जिल्हा कोरोना संसर्गाबाबत राज्यातील इतर जिल्ह्यांचा तुलनेत सुरक्षित होता. मात्र जूनपासून कोरोना संसर्गाचा आकडा वाढत गेला आहे. एकाच दिवशी ४७ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातही लगतच्या जिल्ह्यांप्रमाणेच कोरोनाने हळू हळू पाय पसरवायला सुरवात केली आहे. शनिवारपर्यंत १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर रविवारच्या अहवालानुसार पुन्हा १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दोन दिवसात २७ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात नंदुरबार व शहादा येथील रूग्णांचा समावेश आहे. हे रूग्ण संसर्गित व्यक्तीच्या संपर्क साखळीतील आहेत. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातही आता कोरोनाने उग्ररूप धारण केले आहे. 
गेल्या दोन महिन्यापासून अत्यंत स्लो गतीने आढळणाऱ्या रूग्णांमुळे नंदुरबार जिल्हा कोरोना संसर्गाबाबत राज्यातील इतर जिल्ह्यांचा तुलनेत सुरक्षित होता. मात्र जूनपासून कोरोना संसर्गाचा आकडा वाढत गेला आहे. एकाच दिवशी ४७ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे पस्तीसच्या पुढे न गेलेल्या बाधितांचा आकड्याने पंच्याहत्तरी पार केली होती. आता पुन्हा या दोन दिवसात २७ रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. रविवारच्या अहवालानुसार पुन्हा दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात तोरखेडा (ता. शहादा) येथील संसर्गित रूग्णाच्या संपर्कातील व्यक्ती आहेत. शहादा तालुक्यातील आठ, तळोदा एक व नंदुरबार एक असे दहा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पुन्हा नंदुरबार व शहादा अलर्ट झोनमध्ये आहे. 

आतापर्यंत २५९ व्यक्तींना डिस्चार्ज 
कोरोना महामारीचे थैमान सुरू झाले ,तेव्हापासून आतापर्यंत १९० व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना संसर्गातून आतापर्यंत २०७० जणांचे स्वॅब घेऊन तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १७६५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आरोग्य विभागात सेवा देणारे डॉक्टरर्स व कर्मचाऱ्यांचे आतापर्यंत ४४६ जणांचे स्वॅब तपासणी झाली आहे. आतापर्यंत २५९ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आले आहेत. बाधितांमधील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. सुविधांचा अभाव असला तरी डॉक्टर्स व कर्मचारी आपल्या परीने चांगले उपचार करीत आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढली आहे. आज सकाळी जिल्हा रूग्णालयात दाखल २५ जण कोरोनामुक्त झाल्याने व सायंकाळी एकलव्य इंग्लिश मीडिअम स्कूलच्या विलगीकरण कक्षातील २३ जणांना सायंकाळी डिस्चार्ज देण्यात आले. 

नागरिकांनो स्वतःहून पुढे या... 
शहादा
: शहरातील विविध भागात वास्तव्य करणाऱ्या सात रुग्णांच्या अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्याने शहादावासीयांचा चिंतेत भर पडली आहे. प्रशासनाने उपाययोजनांवर भर दिला असून पालिकेतर्फे शहरात फवारणी तर आरोग्य विभागामार्फत पथके कार्यान्वित करून नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान ज्या लोकांशी संबंधित रुग्णांच्या संबंध आला असेल, अशा लोकांनी स्वतःहून आरोग्य विभाग किंवा प्रशासनाशी संपर्क साधून माहिती द्यावी, त्यामुळे प्रशासनास रुग्णांची साखळी तोडण्यास मदत होईल. 
शहरात विविध कॉलनी परिसरात राहणाऱ्या सात व्यक्तींचा कोरोना पॉझिटिव्ह अहवालामुळे प्रथमच मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी प्रशासनास कंटेनमेंट झोन जाहीर करावे लागले. प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रशासनाकडून सर्वत्र खबरदारी घेण्यात येत आहे.रात्री उशिरापर्यंत रुग्ण वास्तव्यास असलेल्या भागात प्रांताधिकारी डॉ. चेतन सिंग गिरासे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र पेंढारकर व कर्मचाऱ्यांकडून संबंधित भागात उपाययोजना सुरु होत्या. 
वाढत्या संसर्ग साखळीला थोपवण्यासाठी प्रशासनाकडून नागरिकांनी घराबाहेर पडू नये,मास्क वापरावे, बाजारात गर्दी करु नका, असे आवाहन वारंवार करूनही नागरिक मात्र जुमानत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.त्यामुळे गर्दीला आवर घालण्यासाठी प्रशासनाने कठोर व्हावे, अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar corona virus chain continue and last two deys 27 positive