नंदुरबार : कोरोनाने आणखी दोघांचा बळी 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 July 2020

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाने संथगतीने शिरकाव केला. मात्र तीन महिन्यांनंतर त्याने उग्ररूप धारण केले. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. प्रशासन उपाययोजनांसाठी प्रयत्न करीत आहे. आजअखेर जिल्ह्यात एक हजार 952 जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यांपैकी 163 स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 163 व्यक्ती बाधित आहेत.

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढतच चालला आहे. त्यात, आतापर्यंत सात जणांचा बळी गेला आहे. बुधवारी (ता. 1) आणखी दोन बाधितांचा मृत्यू झाल्याने नंदुरबारकरांची चिंता वाढली आहे. 
नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाने संथगतीने शिरकाव केला. मात्र तीन महिन्यांनंतर त्याने उग्ररूप धारण केले. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. प्रशासन उपाययोजनांसाठी प्रयत्न करीत आहे. आजअखेर जिल्ह्यात एक हजार 952 जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यांपैकी 163 स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 163 व्यक्ती बाधित आहेत. हा आकडा गेल्या महिनाभरातच जास्त वाढला आहे. दोन महिन्यांत सात जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर बुधवारी पुन्हा दोघांचा बळी गेला आहे. बुधवारी तोरखेडा येथील कोरोनाबाधित संपर्क साखळीतील 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. त्यांना जिल्हा रुग्णालयात क्वारंटाइन केले होते. त्यांचा स्वॅब अहवाल येणे बाकी आहे. तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला. तसेच धुळवद (ता. नंदुरबार) येथील 54 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. या दोघांचा बुधवारी मृत्यू झाल्याने मृतांची संख्या नऊ झाली. जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. 
 
तोरखेडा येथील व्यक्तीचा मृत्यू 
शहादा : तोरखेडा (ता. शहादा) येथील कोरोनाबाधिताच्या संपर्कातील 70 वर्षीय वृद्धाचा जिल्हा रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला. संबंधित रुग्णाचा स्वॅब अहवाल प्रशासनास अद्याप प्राप्त झाला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णावर नंदुरबारमध्येच कोविडच्या नियमावलीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. तोरखेडा येथील 70 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल रविवारी आल्यानंतर आरोग्य प्रशासनातर्फे संबंधित व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील आठ व्यक्तींना विलगीकरण कक्षात आणण्यात आले होते. तसेच 23 व्यक्तींना होम क्‍वारंटाइन करण्यात आले होते. बाधित व्यक्‍तीच्या संपर्कातील 70 वर्षीय व्यक्तीला श्‍वसनाचा त्रास होत होता. आरोग्य प्रशासनाने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. संबंधित व्यक्तीचा स्वॅब अहवाल प्रशासनास अद्याप प्राप्त झालेला नाही. तथापि, खबरदारी म्हणून नंदुरबार येथेच तीन लोकांच्या उपस्थितीत कोविड नियमावलीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. 
 
घाबरू नका, काळजी घ्या 
दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड स्वतः कोरोना संसर्गाबाबत लक्ष घालत आहेत. आरोग्य व महसूल आणि पोलिस विभागाच्या मदतीने जिल्ह्यात कोरोना संपर्क साखळी तोडण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र तरीही नागरिकांकडून होणारी बाजारपेठेतील गर्दी चिंता वाढविणारी आहे. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा नागरिकांना आवाहन केले असून, फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर, गर्दीत जाणे टाळणे या गोष्टी आवर्जून पाळाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar corona virus positive two death today