‘सीसीआय'मध्ये कापसाला ५४५० रूपये भाव 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 January 2020

बाजार समितीच्या अधिकृत खरेदी केंद्रावर केंद्र शासना (सीसीआय)मार्फत पाच हजार तीनश पन्नास ते पाच हजार चारशे पन्नास रूपये भाव मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी होत आहे.

नंदुरबार : सीसीआयअंतर्गत जिल्ह्यात नंदुरबार व शहादा बाजार समितीच्या कापूस खरेदी केंद्रावर कापसाची आवक वाढत असून भावही साडेपाच हजाराच्या घरात मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत आहे. दोन्ही केंद्रावर गतवर्षीपेक्षा जास्त खरेदी होईल असा अंदाज बाजार समितीने व्यक्त केला आहे. 
नंदुरबार बाजार समितीतर्फे पळाशी (ता. नंदुरबार) येथे स्व. राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रात केंद्र शासनाच्या भारतीय कपास निगम (सीसीआय) मार्फत २०१९-२० च्या हंगामाकरीता कापुस खरेदी सुरू आहे. कालअखेर ३७ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. दररोज ५०-६० वाहनांमधून कापूस शेतकरी या केंद्रावर विक्रीस आणत आहेत. 
सद्यस्थितीत खेडा खरेदीमार्फत कापसाला पाच हजाराच्या दरम्यान भाव मिळत असतांना व त्यात देखील वजनमापात पारदर्शकता दिसून येत नाही. अशा परिस्थितीत बाजार समितीच्या अधिकृत खरेदी केंद्रावर केंद्र शासना (सीसीआय)मार्फत पाच हजार तीनश पन्नास ते पाच हजार चारशे पन्नास रूपये भाव मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी होत आहे. शेतकरी बांधवांनी कापूस या शेतमालास सर्वोत्तम भाव मिळण्याकरीता केंद्र शासनामार्फत सुरू असलेल्या अधिकृत केंद्रावर कापूस विक्री करावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती किशोर पाटील व सचिव योगेश अमृतकर यांनी केले आहे. 

शहादा येथे जोरदार प्रतिसाद 
शहादा बाजार समितीच्या कापूस खरेदी केंद्रावर यंदा एक ते सव्वा लाख क्विंटल कापूस खरेदी होण्याची शक्यता आहे. आतापर्यत ८१ हजार क्विंटल खरेदी झाली आहे. भाव चांगला मिळत असल्याने शेतकरी येथे विक्रीला पसंती देत आहेत. या केंद्रावर गेल्यावर्षीही चांगली खरेदी झाली होती. शेतकऱ्यांनी जास्तीतजास्त कापूस विक्रीसाठी आणावा असे आवाहन बाजार समिती प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar cotton rate CCI