esakal | आताच फुटले अन्‌ लागलीच त्‍यावर चोरट्यांची नजर
sakal

बोलून बातमी शोधा

cotton robbery

भोरटेक (ता. शहादा) येथील शेतकरी प्रकाश नारायण गिरासे व सरकार नारायण गिरासे यांच्या मालकीचे भोरटेक शिवारातील गावाजवळील शेतात मे महिन्यात कापसाची लागवड केली होती. हा कापूस आता फुटण्यास सुरवात झाली.

आताच फुटले अन्‌ लागलीच त्‍यावर चोरट्यांची नजर

sakal_logo
By
दिनेश पवार

मंदाणे (नंदुरबार) : उन्हाळी लागवड झालेल्‍या बागायती कापूस आता फुटण्यास सुरवात झाली आहे. संततधार पावसामुळे शेतात फुटलेला कापूस वेचणी करणे शेतकऱ्यांना जमले नाही. परंतु, शेतकऱ्याने कापूस वेचणी करण्यापुर्वीच चोरट्यांनी शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोने चोरून नेल्‍याची घटना भोरटेक (ता. शहादा) येथे उघडकीस आली आहे. 

भोरटेक (ता. शहादा) येथील शेतकरी प्रकाश नारायण गिरासे व सरकार नारायण गिरासे यांच्या मालकीचे भोरटेक शिवारातील गावाजवळील शेतात मे महिन्यात कापसाची लागवड केली होती. हा कापूस आता फुटण्यास सुरवात झाली असून हा कापूस अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास शेतातूनच लांबवला. शेतात लावलेला कापसाची अद्याप एकही वेचणी झालेली नाही. आधीच शेतकरी बांधव कोरोना महामारी व लॉकडाऊनला कंटाळलेले आहेत. त्यातच असे चोरीचे प्रकरणे घडत असतील तर शेतकरी बांधव काय करतील.

पावसामुळे अगोदरच नुकसान
कापसाच्या झाडावरील कैरी पक्‍की झाली आहे. सततच्या पावसामुळे या कैरी सडल्‍या आहेत. एकतर आधीच कापसाचे तुरडक स्वरूपाचा पावसामुळे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी देखील बाहेर ओला असलेला कापूस वाळण्यासाठी टाकलेला होता; त्यातून देखील रात्रीच्या अंधारात चोरट्यांनी कापूस चोरून नेला होता. कापूस पिकाचे उत्पन्न निघण्यास सुरुवात झाली की शेतकरी बांधवांना रात्रंदिवस शेतातच राहावे लागते. असे चोरीचे प्रकरणांना शेतकरी त्रस्त झाले आहेत. 

व्यापाऱ्यांनी आधार कार्ड- सातबारा घ्यावा 
उपजीविकेचे साधन म्हणून गावोगावी किरकोळ व्यापाऱ्यांकडून कापूस हंगाम सुरू झाल्यावर कापूस खरेदी केली जाते. तसेच हा परिसर मध्यप्रदेश राज्यालगत असून खेतीया (म.प्र.)येथे मोठी मार्केट देखील जवळच आहे. त्यामुळे चोरट्यांना सहजरित्या चोरी केलेल्या कापसाची विल्हेवाट लावणे सोपे जाते. त्यामुळे यावर आळा घालण्यासाठी मार्केटमध्ये कापूस घेतांना कापूस विक्री करणाऱ्याकडून ज्या पद्धतीने आधारकार्ड/पासबुक/सातबारा जमा केला जातो. त्याप्रमाणेच किरकोळ व्यापाऱ्यांनी देखील कापूस खरेदी करतांना संबंधितांकडून वरीलप्रमाणे कागदपत्रे घावेत. जेणे करून चोरीच्या मालावर अंकुश बसेल आणि चोरटे चोरी करतांना घाबरतील. अशी देखील अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या सर्व प्रकाराकडे पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे व किरकोळ कापूस खरेदी करताना कापूस विक्री करणाऱ्या व्यक्तीकडून ओळख म्हणून वरील कागदपत्रे घेण्याबाबत व्यापाऱ्यांना सूचित करावे, अशी मागणी शेतकरी बांधव करीत आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे