नंदुरबारमध्ये भाजप मध्ये गटबाजी, सोशल मिडीयावर वाद चव्हाट्यावर !

मुकेश पटेल
Friday, 28 August 2020

नंदुरबार भाजप पक्ष आजच्या घडीला आपली मोठी फौज जिल्ह्यात उभी करू शकला आहे, ही सगळी मेहनत मागील २५ वर्षांपासून ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी घेतली.

लोणखेडा ः नंदुरबार जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, परंतु नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वानंतर नंदुरबार जिल्हा सुद्धा भाजपमय होण्यापासून वाचू शकला नाही. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्याने जिल्ह्यातील पक्षात वाढ झाली आहे. पक्षातर्फे नुकतीच नवीन जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे, या कार्यकारिणीवरून पक्षातील वाद आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला असून जिल्ह्यातील भाजपत नवीन गट व जुना गट अशी दुफळी निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. यासंदर्भात भाजपचे नंदुरबार जिल्‍हा वैद्यकीय आघाडीचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार संनसे यांनी सोशल मीडियावर खरडपट्टी काढल्याने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. 

जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याने डॉ. संनसे यांनी नवीन कार्यकारिणी जाहीर करणाऱ्या पक्षश्रेष्ठींवर सरळ निशाणा साधला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी पक्षात प्रवेश केल्याने पक्ष मजबूत झाला आहे. नंदुरबार भाजप पक्ष आजच्या घडीला आपली मोठी फौज जिल्ह्यात उभी करू शकला आहे, ही सगळी मेहनत मागील २५ वर्षांपासून ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी घेतली त्यांनाच कार्यकारिणीमधून डावलल्याने जुनी फळी दुखावली आहे व पक्षांतर्गत नाराजीच्या सूर दिसून येत आहे. सोशल मीडियावर वाक युद्धाच्या माध्यमातून सरळ सरळ तोफ डागण्यात येत असल्याने अंतर्गत मतभेद आता उघड झाले आहेत. निष्ठावंत कार्यकर्त्यांची अंतर्गत नाराजी पक्षासाठी भविष्यात डोकेदुखी ठरू शकते असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तविला जात आहे. 

निष्ठावंत कार्यकर्त्यांची अडचण का वाटावी? 
वैद्यकीय आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार संनसे यांनी पक्ष प्रमुखांना सोशल मीडियाद्वारे संपर्क साधून आपल्या मनातील भावना स्पष्ट केल्या आहेत. मागील २५ वर्षांपासून जनसंघाच्या माध्यमातून स्वर्गीय दिलवरसिंग पाडवी, डॉ. नरेंद्र पाडवी, सुहास नटावदकर, एकनाथ खडसे यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या झेंडा राज्यात तसेच केंद्रात सत्ता नसतानाही खंबीरपणे धरून ठेवला व पक्ष सोडला नाही. ज्या सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांनी भाजप पक्ष वाढीसाठी कसोशीने प्रयत्न केले त्यांची अडचण जिल्हा नेतृत्वाला का वाटावी? काम केलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्या. भाजप हा एका विचाराने बांधलेला पक्ष आहे. एकमेकांना संपवण्याच्या नादात पक्षावर च्या विश्वास संपत आहे हे मात्र नक्की असे डॉ. तुषार संनसे यांनी यावेळी म्हटले आहे.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Dispute erupts in BJP over selection of new executive